Categories: Featured

अन्यथा… राजू शेट्टी ‘महाविकास आघाडी’ सरकारच्या विरोधातही रस्त्यावर उतरणार!

लोकशाही.न्यूज। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी मागील देवेंद्र फडणवीस सरकारच्या विरोधात मोठी आक्रमक भूमिका घेतली असून, तेव्हाच्या काळातील घोटाळे पुराव्यानिशी बाहेर काढणार असल्याचा इशारा दिलाय. त्याचबरोबर विद्यमान ठाकरे सरकारने जर शेतकऱ्यांवर अन्याय केला तर या सरकारविरोधातही रस्त्यावर उतरू असे शेट्टी यांनी सांगितलय.

फडणवीस सरकारमध्ये बांधकाम कामगार मंडळात मोठा घोटाळा झाला असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. तसेच आयटीमध्येही मोठा घोटाळा झाला आहे, हे सर्व घोटाळे पुराव्यानिशी बाहेर काढणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. 

यावेळी राजू शेट्टी म्हणाले की, भाजप सत्तेत येऊ नये म्हणून आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. परंतु जर शेतकऱ्यांवर अन्याय झाला तर आम्ही महाविकास आघाडीच्या सरकारविरोधातही रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला. राज्याचे मंत्री जयंत पाटील यांनी कर्जमाफीबाबत चुकीचा आकडा मांडला असून त्यांनी याद्या जाहीर कराव्या आणि ३१ हजार कोटींची बेरीज करुन दाखवावी असे आवाहन केले.

याबरोबरच, सिंचन घोटाळ्यात नेमकं काय झालं? याचं सत्य बाहेर आलंच पाहिजे. त्याला कोण जबाबदार आहे, कोण नाही याबद्दल आम्हाला काही देणंघेणं नाही. परंतु, एवढ्या मोठ्याप्रमाणावर सिंचनावर पैसा खर्च होऊन देखील, जर सिंचन वाढलेलं नसेल, तर नेमकं पाणी कुठतरी मुरतं आहे. पैसा कुठंतरी मुरलेलाच आहे आणि म्हणूनच हे सत्य जनतेला कळालं पाहिजे, हा जनतेचा अधिकार आहे. कारण, शेवटी तो करदात्यांचा पैसा आहे. असही राजू शेट्टी यांनी माध्यमांसमोर सांगितले.

Team Lokshahi News