मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात चर्चिल्या जाणाऱ्या राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाला (Rajya Sabha Election voting) थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. या निवडणुकीत एक-एक मतदान अत्यंत महत्त्वाचे आहे आणि आपला उमेदवार विजयी करण्यासाठी राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. मात्र, त्याच दरम्यान महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) गोटातून एक मोठी बातमी समोर आली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मतांचा कोटा कमी करण्यात आल्याचं वृत्त Zee 24 तास ने दिलं आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ऐनवेळी उमेदवारांसाठीचा मतांचा कोटा बदलला. 42 ऐवजी कोटा बदलून 44 केला आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) नाराज असल्याची चर्चा आहे.

राज्यसभेसाठी मतांचा कोटा 42 वरुन 44 इतका झाल्यास त्याचा सर्वात जास्त फटका शिवसेना उमेदवाराला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेचे कोल्हापूरचे उमेदवार संजय पवार यामुळे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळेच शिवसेनेत नाराजी असल्याचं बोललं जात आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. त्यासाठी महाविकास आघाडीच्या 4 उमेदवारांचा निर्धारीत विजयी कोटा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल अचानक बदलल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्तं केली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुन्हा सारवासारव करण्यात येत आहे.

महाविकास आघाडीने ठरवल्याप्रमाणे सर्व आमदारांना निर्धारीत विजयी कोटा देण्या संदर्भात पुन्हा चाचपणी करण्यात येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने ठरवल्या प्रमाणे सर्व आमदारांनी त्यांचा मतदानाचा कोटा विधान भवनातील पक्षांच्या बैठकीत जाहीर केला जाईल. यामुळे भाजपचा आत्मविश्वास मात्र वाढल्याचे दिसून येत आहे.