मुंबई | राज्यसभा निवडणुकीवरुन (rajya sabha election result) महाराष्ट्रामध्ये मोठे नाट्य पाहण्यास मिळाले. अखेरीस 9 तासांच्या प्रतिक्षेनंतर हाती आलेल्या निकालात कोल्हापूरमधून धनंजय महाडिक विजयी झालेत. तर शिवसेनेचे उमेदवार संजय पवार पराभूत झाले आहेत.

हॉटेलमध्ये आमदारांचा मुक्काम, मतदान आणि त्यानंतर भाजपने घेतलेल्या आक्षेपानंतर मतमोजणीला तब्बल 8 ते 9 तासांचा विलंब झाला. अखेरीस मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास मतमोजणीला सुरुवात झाली. भाजपकडून तीन उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले होते. पियूष गोयल, अमरावतीमधून अनिल बोंडे आणि कोल्हापूरमधून धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली होती. भाजपने खेळलेल्या खेळीमुळे त्यांचे तिन्ही उमेदवार विजयी झाले. यामुळे महाविकास आघाडीला मात्र मोठा धक्का बसला आहे.

भाजपचे संख्याबळ 122 होते. राज्यसभेचे दोन उमेदवार निवडून आणल्यानंतर भाजपकडे 28 मते शिल्लक राहत होती. पियूष गोयल यांना 48 मतं मिळाली आणि अनिल बोंडे यांनाही 48 मतं मिळाली. त्यानंतर पहिल्या पसंतीची 27 मतं ही धनंजय महाडिक यांना मिळाली. तर महाडिक यांच्याविरोधात उभे असलेले शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना 33 मतं मिळाली. त्यामुळे अपक्षांची 10 मतं फुटल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

कोल्हापूरची कुस्ती महाडिकांनी जिंकली

कोल्हापूर राज्यसभेच्या कुस्तीत भाजपच्या महाडिकांचा विजय झाला आहे.  धनंजय महाडिकांना तब्बल 8 वर्षांनी विजयाचा गुलाल लागला. धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजंय पवार यांचा पराभव करून राज्यसभेच्या खासदारकीची खुर्ची पटकावली. आणि धनंजय यांचा मावळलेला सूर्य पुन्हा उगवतीला आला. गेल्या तीन वर्षात सातत्याचे पराभव महाडिक यांच्या जिव्हारी लागले होते.  2019 साली गोकुळ गेलं.  2019 साली लोकसभेत पराभव झाला.  2019 साली विधानसभेत पराभव झाला यामुळे महादेवराव महाडिकांच्या तालमीत वाढलेल्या या पठ्ठ्याचा सूर्य अस्ताला चालल्याचे बोलले जात होते.

त्याशिवाय माझं नावच घोषित झालं नसतं – धनंजय महाडिक

“भाजपाचे आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब, चंद्रकांत दादा पाटील यांच्या कष्टामुळे, यांच्या रणनितीमुळे भाजपाचे तिन्ही उमेदवार निवडून आले. कोणतीही निवडणूक असली की टेन्शन हे असतंच. ज्या दिवशी अर्ज भरला, तेव्हाच सांगितलं होतं की भाजपाचे तिन्ही उमेदवार निवडून येतील, कारण फडणवीस साहेबांच्या डोक्यात संख्याबळाचं गणित असल्याशिवाय माझं नावच घोषित झालं नसतं”, अशी भावना धनंजय महाडिक यांनी विजयानंतर व्यक्त केली आहे..

भाजपने असा केला गेम चेंज

संजय पवार यांना मिळालेली मतं – 33+2 = 34
संजय पवार यांना 33 मते मिळाली त्यात प्रफुल्ल पटेल यांना मिळालेली 43 मते त्यातील 41 चा कोटा पूर्ण करत उरलेली 2 तर प्रतापगडी यांना मिळालेली 44 मते त्यातील 41 चा कोटा पाहता 3 मत शिल्लक राहतात. त्यामुळे संजय पवार यांना 38 मते मिळाली.

धनंजय महाडिक यांना मिळालेली मतं – 27+7+7 = 41
धनंजय महाडिक यांना 27 तर पियुष गोयल यांना 48 मते मिळाली त्यातील 41 चा कोटा पूर्ण करत 7 अधिक मते. तर अनिल बोंडे यांना ही 48 मते मिळाली त्यातील 41 चा कोटा पूर्ण करत 7 अधिक मते मिळाली. 27 अधिक पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांची 14 मते अशी धनंजय महाडिक यांना 41 मते मिळाली यामध्ये महाडिक यांचा विजय झाला आहे.

भाजपने असा केला नंबर गेम
भाजपने महाविकास आघाडी समर्थक 6 अपक्ष आमदारांना फोडले आणि त्यांची पहिल्या पसंतीची मतं मिळवली. तसेच तटस्थ असलेल्या मनसे 1 आणि बहुजन विकास आघाडीनेही त्यांची 3 मतं भाजपला दिली. अशी एकूण 10 मतं भाजपला अतिरिक्तं मिळाली. या नंबर गेमने भाजपच्या तीनही उमेदवारांना जिंकून दिलं.

सतेज पाटलांच्या वर्चस्वाला धक्का

कोल्हापूर जिल्ह्यात सतेज पाटलांचं वर्चस्व दिवसेंदिवस वाढत चाललं होतं. सतेज पाटलांना चार वेळा आमदारकी, दोन वेळा राज्यमंत्रिपद मिळालं. कोल्हापूरचं पालकमंत्रीपद मिळालं. गोकुळवर सत्ता मिळाली. जिल्हा परिषदेवर सत्ता मिळाली. महापालिकेवर सत्ता मिळाली. जिल्हा बँकेवर सत्ता मिळाली. यामुळे सतेज पाटलांचा वारु चौखूर उधळला होता. त्यातच कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक लागली. तिथेही सतेज पाटलांच्या नेतृत्त्वात काँग्रेसनं बाजी मारली. त्यामुळे सतेज पाटील यांनी महाडिक कुटुंबाला राजकारणातूनच हद्दपार करण्याचा प्रयत्न चालवला होता. मात्र त्यांच्या या प्रयत्नांना लगाम बसला आहे.  

महाडिक यांच्या विजयाने भाजपला कोल्हापुरात संजीवनी

सतेज पाटील विरोधकांची मोट बांधण्याचे प्रयत्न धनंजय महाडिक यांच्याकडून होणार आहे. आगामी मनपा, जिल्हा परिषद, आणि पंचायत समिती निवडणुकीत  महाडिक विरुद्ध पाटील सामना रंगणार हे आता निश्चित आहे. गोकुळनंतर राजाराम साखर कारखाना हाती घेण्याच्या बंटी यांच्या मनसुब्याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न देखील होईल. भाजपमुक्त झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यात महाडिक यांच्या विजयाने भाजपला संजीवनी मिळाली आहे. धनंजय महाडिक यांच्या  रूपाने भाजपला जिल्ह्यात पहिला खासदार मिळाला आहे. 

राज्यसभेचे विजयी उमेदवार

शिवसेनेचे नेते संजय राऊत, काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी दिली होती.  तर राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल रिंगणात होते. मतमोजणी अंती महाविकास आघाडीने तिन्हीही जागा जिंकल्या आहेत. तर भाजपचे पियूष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक विजयी झाले.