Categories: Featured

आणि असा संपन्न झाला बहुप्रतिक्षित राम मंदिराचा पायाभरणी सोहळा

बहुप्रतिक्षित राम मंदिराचा पायाभरणी समारोह संपन्न

बहुप्रतिक्षित अशा राम मंदिराच्या पायभरणीचा आज सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंत्रोच्चाराच्या गजरात पार पडला असून, रामनामाच्या जयघोषाने अवघी अयोध्यानगरी दुमदुमली आहे.
संपूर्ण हिंदूंच्या आस्थेचा प्रश्न असलेल्या राम मंदिराच्या भूमीपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येत आले होते. पंतप्रधानांच्या हस्ते हनुमान गढीवर पताका चिन्हाचे पूजन करून
पायाभरणी कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रस्थान करण्यात आले. याठिकाणी पंतप्रधानांनी वृक्षारोपण करीत मंदिराचे भूमिपूजन केले. मंदिराच्या पायभरणी कार्यक्रमात मोदींसह उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरसंघचालक मोहन भागवत, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि महंत नृत्यगोपालदास हे मंचावर उपस्थित होते.

पवित्र माती आणि जल अयोध्येत
भूमिपूजनासाठी देशातील 36 परंपरांच्या 135 संतांनी उपस्थिती लावली असून जवळपास 1500 ठिकाणांहून माती आणि 2000 ठिकाणांहून पवित्र जल अयोध्येत नेण्यात आले होते.

‘तेव्हाच पाऊल ठेवू जेव्हा राम मंदिराची पायाभरणी करू’

तब्बल २९ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पंतप्रधान मोदी हे अयोध्येत पोहोचले असून यापूर्वी १९९१ साली ते अयोध्येत आले होते.
यापार्श्वभूमीवर एक जुना इंटरव्ह्यू व्हायरल होत असून मोदी म्हंटले होते की, ‘आता इथे तेव्हाच पाऊल ठेऊ जेव्हा राम मंदिराची पायाभरणी करू’ अयोध्येशी पंतप्रधानांचे खूप जुने नाते असून 1990 साली लालकृष्ण आडवाणी यांनी सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा काढली होती त्यावेळी मोदी या रथयात्रेत सामील झाले होते.

जगभर प्रसादाचे वाटप करणार

अयोध्येत प्रसादासाठी 1 लाख 11 हजार लाडू तयार करण्यात आले असून राम मंदिराचा प्रसाद भारतीय दूतावास जगभर वाटणार आहे.
अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या प्रस्तावित मॉडेलचे फोटो तीर्थक्षेत्राने ट्विटरवर जाहीर केले आहेत. श्री रामजन्मभूमी मंदिर हे भारतीय वास्तुशिल्प, आधुनिकता आणि भव्यतेचा मिलाफ असेल.

Team Lokshahi News