Categories: राजकीय

अहो रामराज्य अवतरणार आहे रामराज्य..!

नितीन थोरात (पत्रकार, लेखक) यांच्या फेसबुक वॉलवरून साभार

भारतीय जनता पार्टी म्हणजे समाजकारण. जनतेशी बांधिलकी. न्यायप्रिय शासननिर्मितीची उभारणी. गुगलवर भारतीय जनता पार्टी शोधले की गुगल विचारते की तुम्ही मोक्षप्राप्ती शोधत आहात का? एवढ्या अफाट आणि अचाट विचारनिर्मितीची साखळी भारतीय जनता पार्टीने निर्माण केली आहे.

भाजपची महाराष्ट्रात सत्ता होती तोवर राज्य सुजलाम सुफलाम होते. शेतकरी आत्महत्या करत नव्हते. कसला भ्रष्टाचार होत नव्हता की कुणी दु:खी नव्हते. महागाई नव्हती, गुन्हेगारी नव्हती. माणसं कमी आणि रोजगार जास्त होते. कंपन्यांचे मालक बळजबरीने कामगारांच्या खात्यावर जादाचा पगार देत होते. सगळा कसा आंनदी आनंद. पण, निवडणूका झाल्या आणि कपटी राजकारण सुरु झाले.

जनतेचा विश्वासघात करुन राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसने हातमिळवणी करत भारतीय जनता पार्टीसारख्या निष्कलंक पक्षाला सत्तेबाहेर ठेवले. भारतीय जनता पार्टी म्हणजे हिंदुत्ववाद्यांची पार्टी, भारतीय जनता पार्टी म्हणजे मनुस्मृतीचे पूजन करणाऱ्यांची पार्टी, भारतीय जनता पार्टी म्हणजे चातुर्वण्यव्यवस्था मानणाऱ्या ब्राह्मणांची पार्टी, अशी नावंही ठेवण्यात आली. पण देवाब्राह्मणांचा शाप कधी फेल जात नाही.

भारतीय जनता पार्टीला सत्तेबाहेर ठेवले आणि राज्यातल्या शाळा बंद झाल्या. दुकानं बंद झाली. रस्ते सामसूम झाले. आर्थिक व्यवहार ठप्प झाले. लाखो लोकांचे रोजगार गेले. हजारो आत्महत्या झाल्या. आजवरच्या इतिहासात घडले नाही ते घडले. पण, भारतीय जनता पार्टीला हे नकोय. लेकराबाळांच्या शाळा सुरळीत सुरु व्हाव्यात. कंपन्या, दुकाने सुरु व्हावीत, अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर यावी, म्हणून आमचे नेते राज्यपाल भवनाचे उंबरठे झिजवत होते. केवळ जनतेच्या मनातील सरकार राज्यात यावे आणि आपल्या राज्याचे कल्याण व्हावे या उदात्त आणि निस्वार्थ हेतूने राजकीय घडी बसवण्याचा आमचा प्रयत्न सुरु होता.

आणि आता सगळ्यांना सांगण्यात अतिशय आनंद होतोय की जनतेच्या कल्याणासाठी केलेली धडपड अंतिम टप्प्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात राज्यात भाजपचे सरकार येईल. पंधरा ऑगस्टला वंदनीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.

भाजपने कधीच राजकारण केले नाही. मात्र, जनतेच्या भल्यासाठी काळजावर दगड ठेवत आम्ही विरोधी पक्षातील आमदार फोडून सत्तेसाठीची मॅजिक फिगर गाठली आहे.

मित्रांनो राज्यात पुन्हा एकदा रामराज्य अवतरणार आहे. पेढे वाटा पेढे. फराळ करा. गाईला गुळपोळीचा नैवेद्य द्या. पुरणपोळी आणि मटकीच्या उसळीचा स्वयंपाक करुन जंगी आनंद साजरा करा.

अहो रामराज्य अवतरणार आहे रामराज्य…

Team Lokshahi News