Categories: गुन्हे

रावसाहेब दानवेंच्या जावयासह एका महिलेवर पुण्यात गुन्हा दाखल

पुणे | भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यासह एका महिलेवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हृदयशस्त्रक्रिया झालेल्या नागरिकास लाथाबुक्यांनी मारहाण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी अमन अजय चड्डा (वय २८, रा. बोपोडी) यांनी चतु:श्रृंगी पोलिसात फिर्याद दिली आहे.

हर्षवर्धन रायभान जाधव (वय ४३, रा. बालेवाडी) आणि इषा बालाकांत झा (वय ३७, रा. वाकड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ही घटना ब्रेमन चौकाकडे जाणाऱ्या रोडवर संघवीनगर येथे सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चड्डा यांचे आईवडील दुचाकीवरुन ब्रेमन चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरुन दवाखान्यात निघाले होते. यावेळी जाधव यांनी अचानक त्यांच्या कारचा दरवाजा उघडला. त्यामुळे दुचाकीवरुन जाणाऱ्या चड्डा यांच्या आईच्या पायाला मार लागला. याबाबत त्यांच्या वडिलांनी जाधव यांना जाब विचारला असता वादावादी झाली. यावेळी फिर्यादीचे वडील आपली हृदयशस्त्रक्रिया झाल्याचे जाधव यांना सांगत होते. तरीही त्यांनी छातीत व पोटात लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या आईलाही लाथ मारली. मारहाणीत हे दांपत्य गंभीर जखमी झाले आहे. 

जीवे मारण्याच्या उद्देशाने, जिवीतास धोका निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. जखमी दाम्पत्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात सुरू आहेत. पोलिसांनी हर्षवर्धन जाधव व इषा झा यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र दहीफळे अधिक तपास करीत आहेत.

Team Lokshahi News