रत्नागिरी | रत्नागिरीतील नाट्य, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात गेली २५ वर्ष कार्यरत असणाऱ्या संकल्प कला मंच संस्थेचा क्रीडागौरव पुरस्कार तायक्वांदो क्रीडापटू संकेता सावंत हिला प्रदान करण्यात आला. दरवर्षी विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना ‘गुरू’ मानण्याचा संस्थेचा ‘संकल्प’ असतो. म्हणूनच गुरुपौर्णिमेचा मुहूर्त साधून हे पुरस्कार देण्यात येतात.
यावर्षी संस्थेचं रौप्य महोत्सवी वर्ष असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे मोठा सोहळा न करता गुणवंतांच्या घरी जाऊन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पुरस्कार वितरण केलं. यावेळी तायक्वांदो खेळाडू संकेता संदेश सावंत हिला संस्थेचा क्रीडागौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. संकेता गेली १२ वर्ष या खेळात चमकदार कामगिरी करत असून राज्य स्तरापर्यंत तिने अनेक पदके मिळवली आहेत. या खेळात तीने दोन वेळा ब्लॅक बेल्ट मिळवला आहे. संदेशा राष्ट्रीय पंच परीक्षा उत्तीर्ण असून विविध स्पर्धांमध्ये पंच म्हणूनही काम करते. तृतीय वर्ष कला शाखेत शिकणारी संकेता मारुती मंदिर येथील एससारके तायक्वांदो क्लबचे प्रशिक्षक आणि तालुका संघटनेचे सचिव शाहरुख शेख यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहे.
हा पुरस्कार प्रदान करताना संस्थेचे अध्यक्ष विनोद वायंगणकर, उपाध्यक्ष गजानन गुरव, सचिव रवींद्र साळुंखे, ज्येष्ठ सल्लागार डॉ. दिलीप पाखरे, विनायराज उपरकर, पीआरओ प्रकाश ठीक, पदाधिकारी ज्ञानेश्वर पाटील, गौरव किर इत्यादी उपस्थित होते.