Categories: कृषी

RBI च्या ‘या’ नव्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मिळणार लाखो रुपयांचे कर्ज

नवी दिल्ली | देशातील छोट्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) Reserve Bank of India आपल्या नियमात बदल केले असून प्राथमिकता क्षेत्र ऋण श्रेणीची व्याप्ती  वाढवली आहे. स्टार्ट- अपलाही बँक ऋण प्राथमिक श्रेणीमध्ये समावेश करण्यात आला आहे. याच्या अंतर्गत स्टार्ट- अपला ५० कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध केले जाणार आहे. यातून शेतकऱ्यांना सोलर आणि कंप्रेस्ड बायोगॅस प्लांटसाठी कर्ज मिळणार आहे.  

प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, पीएसएलमधील नव्या श्रेणींमध्ये शेतकऱ्यांना सौर ऊर्जा प्रकल्प आणि बायोगॅस संयंत्रांसाठी कर्ज देण्याचा समावेश आहे. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार प्राधान्य क्षेत्रातील कर्जाच्या प्रवाहात प्रादेशिक असमानतेचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे. यातून अक्षय ऊर्जा आणि स्वास्थ्य पायाभूत सुविधांसाठी कर्ज वाढविण्यात येणार आहे. 

केंद्रीय बँकेने सांगितले की, ‘निवडक जिल्ह्यांना प्राधान्य क्षेत्राचे कर्ज वाढविण्यासाठी त्यांना अधिक प्राधान्य देण्यात आले आहे. काही जिल्ह्यांमध्ये प्राधान्य क्षेत्रातील पतपुरवठा तुलनेने कमी आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने असे म्हटले आहे की, अल्प आणि अल्पभूधारक शेतकरी आणि दुर्बल घटकांसाठी निश्चित केलेले लक्ष्य टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येईल. केंद्रीय बँकेने म्हटले आहे की, शेतकरी उत्पादक संस्था आणि शेतकरी उत्पादक कंपन्यासाठी अधिक कर्जाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. नव्या नियमांतर्गत अक्षय ऊर्जा आणि आरोग्य पायाभूत सुविधांची (आयुष्मान भारत अंतर्गत प्रकल्पांसह) पत मर्यादा दुप्पट करण्यात आली आहे.

Team Lokshahi News