Categories: कृषी

फायदेशिर शेळीपालनासाठी ‘हे’ जरूर वाचा

या लेखात शेळीपालनाचीपंचसूत्री, नवजात करडांचे संगोपन, शेळ्यांचे आजार आणि त्याचे व्यवस्थापन याविषयीची माहिती देण्यात आली आहे. 

भारत हा कृषी प्रधान देश असून आपल्या देशात शेतीला जोडधंदा म्हणून पशूपालन मोठ्या प्रमाणात केले जाते. पशूपालनात कमीत कमी खर्चात अधिक नफा मिळवून देणारे आणि फायदेशिर म्हणून शेळीपालनाकडे पाहिले जाते. शेळीपालनातून दूध आणि मांसाची गरज भागवली जाते. शेळीपालन सर्वच प्रकारचा हवामानात करता येत असल्याने आणि अधिकाधिक नफा मिळवून देत असल्याने अनेकजण शेळीपालनाकडे वळत आहेत. त्यामुळे शासनदेखील शेळीपालन व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देत आहे. (Goat Farming)

शेळी ही गरिबांची गाय असल्याचे म्हटले जाते. अल्पभूधारक शेतकऱ्यांना तर शेळीपालन हे वरदान ठरत आहे. शेळ्यांच्या आरोग्याची योग्य प्रकारे काळजी घेतल्यास त्या कोणत्याही वातावरणात तग धरतात. शेती असो अथवा नसो शेळीपालन करणे सोपे जाते.  त्यामुळे फायदेशिर शेळीपालनाला जर शास्त्रीय ज्ञानाची जोड दिली तर हा व्यवसाय नक्कीच शेतकऱ्यांना चांगली आर्थिक कमाई करून देत आहे.  तसे पाहिल्यास शेळी हा आकाराने लहान प्राणी आहे. त्यामुळे त्यांना गाय म्हैशींच्या तुलनेत जागा कमी लागते. जागेचा व गोठा बांधण्याचा खर्च कमी येतो. करावी लागणारी गुंतवणुक देखील मर्यादित ठेवता येते.  शेळी कळपात राहत असल्यामुळे कळपाची वाढ झपाट्याने होते. लहान कळप घरातील स्त्रिया किंवा मुलेही सांभाळू शकतात. यामुळे मजुरीचा खर्चही वाचवता येतो.

आपल्या देशात आढळणाऱ्या शेळ्यांच्या जातींमध्ये रोगप्रतिकारक क्षमता चांगली आहे. त्यामुळे त्या कोणत्याही वातावरणात राहू शकतात. याउलट विदेशी जातीच्या शेळ्या अधिक उत्पादन देत असल्यातरी त्यांची घ्यावी लागणारी काळजी, उत्पादन खर्च आणि गुंतवणुक अधिक असल्याने अनेकदा अपेक्षित उत्पादन न मिळाल्यास मोठ्या नुकसानीचाही सामना करावा लागतो.  देशी जातीच्या शेळ्यांमध्ये प्रजनन क्षमताही अधिक आहे. प्रत्येक वर्षी शेळ्यांच्या संख्येत ३ ते ४ टक्क्यांनी वाढ होत असते. शेळ्यांपासून मिळणाऱ्या दूधापासूनही चांगले उत्पादन मिळते. याशिवाय शेळ्यापासून लेंडी खत देखील मिळते. शेळी पालनासाठी बँकेकडून ५० हजार ते ५० लाख रुपयांचे कर्जही मिळते. राज्य सरकारकडून या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जाते. राज्यातील मागील सरकारने शेळीपालन योजना सुरु केली होती. ही योजना महाराष्ट्र शेळीपालन योजना या नावाने ओळखली जाते. शेळीपालनाची माहिती आपल्याला आपल्या जवळील पंचायत समिती, ग्राम पंचायत, पशुसंवर्धन विभाग यामध्ये मिळू शकते.

शेळीपालन करताना शेळीच्या जातीची निवड, शेळी आणि करडांचे व्यवस्थापन, त्यांना होणारे आजार आणि त्यावरील उपचार तसेच व्यवसायाचे अर्थशास्त्र याबाबत माहिती असणे आवश्‍यक आहे.

 1. शेळीपालन व्यवसायामध्ये प्रजनन व्यवस्थापन फार महत्त्वाचे आहे. शेळीचे किमान वय ८ ते १० महिन्यांत ३० किलो झाले पाहिजे. या वेळेस शेळी पहिला माज दाखवतात; परंतु पहिले दोन माज रेतन न करता सोडून द्यावेत. तिसऱ्या माजास रेतन करावे.
 2. शेळी अस्वस्थ होणे, सतत ओरडणे, शेपटी हलवणे, खाद्ये खाणे कमी करणे, योनी मार्गात चिकट स्राव दिसून येणे ही शेळीमधील माजाची लक्षणे आढळून येतात.
 3. शेळीतील माजाचे चक्र दर २१ दिवसांनी येते. माजाचा कालावधी ३० ते ३६ तास असतो. असे निदर्शनास आलेले आहे, की शेळीमधील स्त्रीबीज २४ ते ३० तासांत माज सुरू झाल्यानंतर होत असते. या करिता शेळीस या कालावधीमध्ये किमान दोन वेळेस रेतन करावे.
 4. २५ शेळ्यांकरिता १ नर असावा. शेळीमध्ये दोन वर्षांला तीन वेत घेतल्यास शेळीपालन व्यवसाय जास्त फायदेशीर ठरू शकतो.
 5. माजाची तारीख, रेतन झालेली तारीख व इतर सर्व प्रजनन विषयी नोंदी ठेवाव्यात.
 6. रेतन केल्यानंतर दोन पुढील माजाची काळजीपूर्वक पाहणी करणे, माज दिसून आला नाही तर गाभण असण्याची शक्‍यता असते. वजन वाढणे व इतर लक्षणांवरून गाभणची खात्री करून घ्यावी.
 7. वेळोवेळी पशुवैद्यकाकडून तपासणी करून घ्यावी. त्यानुसार शेळी गाभण असल्याची खात्री करून घ्यावी.
 8. शेळीचा गाभण काळ १४५ ते १५० दिवस असतो.
 9. गाभण शेळ्यांचे व्यवस्थापन वेगळे करावे. गाभण शेळ्यांना संतुलित आहार, हिरवा व वाळलेला चारा, स्वच्छ पाण्याचा वेळेवर पुरवठा करावा. वेळोवेळी आरोग्याची काळजी घ्यावी. योग्य काळजी घेतल्याने सशक्त करडे जन्मतात.
 10. शेळी व करडांना औषध उपचार तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावा.
 • नवजात करडांचे संगोपन
  • नवजात करडास शेळी स्वतः चाटून स्वच्छ करते, त्याचे दोन फायदे असतात, त्यामुळे करडांचे रक्ताभिसरण वाढत असते; शेळीने चाटून स्वच्छ न केल्यास पिलांचे अंग स्वच्छ, खरखरीत कापडाने स्वच्छ करावे. नाकातील व तोंडातील चिकट स्राव काढावा, त्यामुळे करडांना श्‍वास घेण्यास सोपे जाते. खुरांवर वाढलेला पिवळा भाग हळूच खरडून काढावा, जेणेकरून करडांना ताठ उभे राहता येईल.
  • करडांना उभे राहण्यास मदत करावी. करडे उभे राहिल्यानंतर शेळीच्या सडाला तोंड लावून दूध पिण्याचे प्रयत्न करते की नाही ते पाहावे. नाही तर दूध पिण्यास शिकवावे. पिलू जन्मल्यानंतर अर्धा तासाच्या आत शेळीचे दूध म्हणजे चीक पाजणे आवश्‍यक असते, यामुळे करडांची रोगप्रतिकारक्षमता वाढत असते आणि करडांची पचनसंस्था व पचनमार्ग साफ होतो.
  • पहिल्या आठवड्यात करडाच्या वजनाच्या दहा टक्के एवढे दूध चार- पाच वेळेस विभागून पाजावे. आवश्‍यकतेपेक्षा जास्त दूध पाजू नये, नाही तर अपचन होऊन हगवण वाढते. करडे जन्मल्यानंतर त्याचे वजन करून नोंद करून घ्यावी.
  • जन्मल्यानंतर पाच-सात दिवस शेळी व करडे एकत्र ठेवावीत. रोज त्यांना वजनाच्या दहा टक्के दूध तीन- चार वेळा विभागून पाजावे. शेळीच्या पाण्याची व्यवस्था/ भांडे उंचीवर असावे, जेणेकरून करडे पाण्यात पडणार नाहीत, याची काळजी घेता येते.
  • साधारणपणे ६५-७० दिवसांपासून करडांचे दूध कमी करत ९० दिवसांपर्यंत पूर्णपणे बंद करावे आणि शेळीपासून पूर्णपणे वेगळे करावे. करडांना वयाच्या ३०ते ४० दिवसांपासून मऊ, लुसलुशीत चारा देण्यास सुरवात करावी, जेणेकरून चारा खाण्याची सवय होऊ लागते.
  • करडांची निरोगी व झपाट्याने वाढ करण्यासाठी त्यांना आवश्‍यक औषधी, सकस आहार इ.कडे बारकाईने लक्ष द्यावे. खनिज क्षारांचा पुरवठा करण्यासाठी खनिज विटा टांगून ठेवाव्यात.
  • करडांच्या गोठ्यात अनावश्‍यक गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. गोठ्याची नियमित स्वच्छता करावी.
  • करडे पाच महिन्यांच्या नंतरच विक्रीसाठी काढावीत, कारण या वयानंतर करडांची वाढ झपाट्याने होते व जास्त नफा मिळतो.
  • पशुवैद्यकाच्या सल्ल्याने लसीकरण करावे.

हिवाळा आणि पावसाळी हंगामात शेळ्यांची योग्य काळजी घ्यावी लागते. कारण या दिवसात त्यांना विविध रोग आणि आजार होण्याची शक्यता असते. शेळ्यांमध्ये आढळून येणारे रोग आणि आजार याविषयी पशुपालकांनी माहिती करून घेणे गरजेचे आहे.

 • लाळ्या खुरकूत
  • दोन खूर असणाऱ्या सर्व जनावरांना हा आजार होतो. आजार संसर्गजन्य असल्याने झपाट्याने पसरतो. ऑक्‍टोबर ते फेब्रुवारी महिन्यांत याचा प्रादुर्भाव दिसून येतो.
 • कारणे –
  • 1) हा आजार विषाणुजन्य आहे. हे विषाणू थंड वातावरणामध्ये अधिक काळ कार्यक्षम राहतात.
  • 2) प्रसार प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संसर्गाने होतो.
  • 3) रोगी शेळ्यांची लाळ, मल-मूत्र इत्यादीने दूषित झालेले चारा, पाणी, दूषित हवा, तसेच रोगी शेळ्यांच्या संपर्कातील माणसांद्वारा या रोगाचा प्रसार होतो.
 • लक्षणे
  • 1) या आजारात तोंडात विशेषतः ओठांच्या आतील बाजूस, जिभेवर, हिरड्यांवर सुरवातीस पाणी भरलेले फोड येतात. नंतर त्या भागावरील आवरणे निघून लालसर जखमा होतात. अशाच प्रकारच्या जखमा या पायाच्या खुरांमध्ये दिसून येतात.
  • 2) आजारातून साधारणपणे ८ ते १० दिवसांत शेळ्या बऱ्या होतात; परंतु गाभण शेळ्यांत गर्भपात, करडांचा मृत्यू, जखमांची योग्य ती काळजी घेतली नाही तर त्यात अळ्या पडून सडणे यामुळे आर्थिक नुकसान होते
  • 3) शेळ्यांच्या कासेवर जखमा होतात. कासेवरील जखमेमुळे कासदाह होण्याची शक्‍यता असते.
 • उपचार
  • 1) हा आजार विषाणुजन्य असल्याने यावर निश्‍चित असा उपचार नाही. मात्र जखमा चिघळू नयेत म्हणून उपचार करावेत.
  • 2) तोंड आणि खुरातील जखमा पोटॅशियम परमॅंगेनेटच्या द्रावणाने धुवाव्यात. त्यानंतर तोंडातील जखमांवर जंतुनाशक मलम लावावे. जखमेत अळ्या असतील तर टर्पेटाईन तेल टाकून अळ्या काढाव्यात. जंतुनाशक मलम लावावे. पशुतज्ज्ञांकडून शेळ्यांना प्रतिजैवक व जीवनसत्त्वांचे इंजेक्‍शन द्यावे.
 • प्रतिबंध
  • 1) आजारी शेळ्यांना निरोगी शेळ्यांपासून वेगळे बांधावे. त्यांना स्वतंत्र चारा आणि पाणी द्यावे.
  • 2) आपल्या भागात रोगाची लागण झालेली असेल तर नवीन शेळ्यांची खरेदी शक्‍यतो टाळावी.
  • 3) शेळ्यांना दर वर्षी सप्टेंबर आणि मार्च महिन्यात लसीकरण करावे.
 • देवी आजार (गोट पॉक्‍स)
  • हा संसर्गजन्य आजार आहे. हा आजार सर्व वयोगटांच्या शेळ्यांत दिसतो; परंतु करडांमध्ये हा आजार घातक ठरतो. साधारणपणे डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान याचा प्रादुर्भाव दिसतो.
 • कारणे –
  • 1) आजार गोट फॉक्‍स नामक विषाणूमुळे होतो.
  • 2) प्रसार प्रत्यक्ष संपर्क, बाधित खाद्य व पाणी याद्वारा होतो.
 • लक्षणे –
  • 1) आजारात खूप ताप येतो, शेळ्या चारा कमी प्रमाणात खातात.
  • 2) ओठ, नाकपुड्या, कान, सड आणि क्वचित शेपटीखाली गाठी येतात. त्यानंतर तेथे खपल्या तयार होतात. या खपल्या जाड व मोठ्या असतात.
  • 3) नाकातील व्रणामुळे श्‍वसनास त्रास होतो. तोंडातील व्रणांमुळे चारा खाण्यास त्रास होतो. कासेवरील व्रणांमुळे कासदाह होण्याची शक्‍यता असते.
  • 4) आजारामुळे करडांमध्ये मरतूक आढळते.
 • उपचार –
  • 1) हा विषाणुजन्य आजार असल्याने थेट उपाय नाही. मात्र आजाराचे प्रमाण वाढू नये यासाठी पशुतज्ज्ञांकडून प्रतिजैवकाचे इंजेक्‍शन द्यावे.
  • 2) ताप कमी होण्यासाठी पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने वेदनाशामक आणि तापनाशक इंजेक्‍शन द्यावे.
 • प्रतिबंध –
  • 1) आजारी शेळ्यांना कळपातून वेगळे करावे. मृत शेळ्यांना जाळून टाकावे किंवा पुरून टाकावे.
  • 2) वर्षातून एकदा डिसेंबर महिन्यात शेळ्यांना रोगप्रतिबंधक लसीकरण करावे.
 • फुफ्फुसदाह (न्युमोनिया)
  • पावसाळा व हिवाळ्यात हा आजार जास्त प्रमाणात आढळतो.
 • कारणे –
  • 1) जीवाणू, विषाणू व बुरशी यांचा प्रादुर्भाव, वातावरणात अचानकपणे होणारा बदल आणि शेळ्यांना जास्त थंडी असलेल्या जागेवर बांधणे इत्यादी कारणांमुळे शेळ्यांना फुफ्फुसदाह होतो.
 • लक्षणे –
  • 1) शेळ्यांना भरपूर ताप येतो, त्या चारा खाणे बंद करतात.
  • 2) शेळ्या ठसकतात, त्यांच्या नाकातून चिकट पिवळ्या किंवा हिरव्या रंगाचा स्राव येतो. शेळ्यांना श्‍वासोच्छवासास त्रास होतो.
 • उपचार –
  • 1) पशुतज्ज्ञाच्या सल्ल्याने शेळ्यांना प्रतिजैवक इंजेक्‍शन द्यावे.
  • 2) आजारी शेळ्यांना ताप येतो त्यामुळे तापनाशक आणि वेदनाशामक इंजेक्‍शन द्यावीत.
  • 3) आजाराच्या प्रतिबंधासाठी शेळ्यांचा वातावरणातील बदलापासून बचाव करावा. शेळ्यांना थंडीपासून संरक्षित करावे.
  • 4) योग्य व्यवस्थापन असेल तर या आजारापासून शेळ्यांचे संरक्षण करता येते.
 • प्रथमोपचार –
  • 1) एका बादलीत गरम पाणी घेऊन त्यात निलगिरीचे तेल मिसळून त्याचा वाफारा शेळ्यांना द्यावा. शेळ्यांना कापूर 1 ग्रॅम व ज्येष्ठमध 4 ग्रॅम यांचे मिश्रण दिल्याने चांगला आराम पडतो.
 • शेळीपालनाची पंचसूत्री
  • १. जातींची निवड
  • २. आहार व्यवस्थापन
  • ३. गोठाबांधणी व व्यक्स्थापन
  • ४. आरोग्य  व्यवस्थापन
  • ५. पणन व्यवस्थापन/विक्री व्यवस्थापन
 • शेळीपालन करण्यासाठी आपल्याकडील स्थानिक जातीचाच वापर करा. निसर्गतः वातावरण , चाऱ्याची उपलब्धता  यानुसार महारष्ट्राला चार प्रमुख जाती दिलेल्या आहेत. विभागनिहाय या जातीचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे
  • मराठवाडा , पश्चिम महाराष्ट्राच्या  कोरडवाहू भागासाठीउस्मानाबादी शेळी
  • अहमदनगर , नाशिक, पुणे या भागासाठी संगमनेरी शेळी
  • कोकण विभागासाठी कोकण कन्याळ.
  • विदर्भासाठी बेरारी.
   • आपण आपल्या भागातील शेळ्यांचे बारकाईन निरीक्षण केल्यास आपल्या असे लक्षात  येईल की, या पूर्वी केलेल्या विविध जातींच्या संकरातून  ४० त ८० टक्के  या विविध जातीच्या शेळ्या तयार झालेल्या आहेत. त्यामुळं शेळ्यांची निवड करताना जातींपेक्षा शेळ्यांच्या गुणवत्तेला जास्त महत्व देण्यात यावं. म्हणजेच आपणास संगमनेरी  जात पाळावयाची असल्यास आपल्या भागातील शेळ्यानमधूनच २ ते ३ करडे देणारी, दोन वर्षातून तीन वित्ते देणारी , दुधाचे प्रमाण १.५ ते २ लिटरपेक्षा जास्त असणारी शेळी निवडावी . मात्र, पैदाशीसाठी जातिवंत बोकड योग्य ठिकाणाहून व्यवस्थित पाहणी करून आणावा. जेणेकरून हळूहळू आपल्याकडे जातीवंत शेळ्यांचा कळप तयार होईल.
Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: commercial goat farming goat farm insurance goat farming loan goat farming Maharashtra goat farming profit goat farming project cost goat farming training by government How can a goat farm be successful How long does it take to grow a goat How much money do goat farmers make insurance for goat farm Which goat is best for farming उस्मानाबाद शेळी पालन गावरान शेळी पालन शेळी पालन शेळी पालन मराठी शेळी पालन माहिती मराठी शेळीपालन अनुदान 2019 शेळीपालन प्रकल्प अहवाल शेळीपालन यशोगाथा