Categories: आरोग्य राजकीय सामाजिक

‘या’संदर्भात मंत्री मुश्रीफ, समरजित घाटगे यांच्याशी चर्चेला तयार!

कागल | सध्या कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणेबरोबर अनेक समाजसेवी संस्था, व्यक्ती पुढे येऊन आपआपल्या परीने कोरोना संकटकाळात योगदान देण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांनी हातात हात घालून काम करूया असे म्हणत मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपले राजकीय विरोधक समरजितसिंह घाटगे यांना कोरोना काळात कारखाना पातळीवर कोविड सेंटर सुरू करण्याबाबत आवाहन केले आहे. 

कागलमध्ये नामदार हसन मुश्रीफ फाऊंडेशन व खासगी डॉक्टर डॉ. अमर पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहातील कोविड हॉस्पिटलच्या उद्घाटन कार्यक्रमात मुश्रीफ बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विरोधक समरजितसिंह घाटगे यांचे नाव न घेता, त्यांचा साखर कारखाना आहे. आवश्यक साधन सामग्रीही तयार आहे. त्यांनीही एखादे कोविड सेंटर सुरू करावे. जनतेच्या सेवेसाठी हातात हात घालून काम करूया. या संदर्भात त्यांच्याशी चर्चेलाही मी तयार आहे. अशा महाभयानक संकट काळात जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे, हे आम्हा सर्वांचे आद्यकर्तव्य आहे, असेही मुश्रीफ म्हणालेत. 

या कार्यक्रमावेळी, नगरसेवक प्रवीण काळबर यांनी सुरु केलेल्या रुग्णवाहिकेचाही शुभारंभ झाला. तसेच कोरोनातून बरे झालेल्या कागल मधील हिंदुराव परसू पसारे (वय-७५) व त्यांच्या पत्नी सौ सुलोचना हिंदुराव पसारे (वय-७०)या जोडप्याच्या हस्ते मंत्री मुश्रीफ यांचा सत्कार झाला. 

कोरोना उपचाराच्या नावाखाली नुसत्या नोटाच छापू नकामंत्री मुश्रीफ
कोरोना उपचाराच्या नावाखाली नुसत्या नोटाच छापू नका. माणुसकीचा ओलावाही जिवंत ठेवा, आगतिक कोरोनाबाधित रुग्णांचा केवळ गैरफायदा न घेता, समाजाची सेवाही करा, असे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी खाजगी डॉक्टरांना केले आहे.

‘माझं कुटुंब -माझी जबाबदारी’ – 
‘माझं कुटुंब -माझी जबाबदारी’ हे अभियान प्रभावीपणे राबवूया, घराघरात ताप आणि ऑक्सिजनची तपासणी करून जे संभाव्य रुग्ण असतील त्यांची टेस्ट करून त्यांच्यावर तातडीने उपचार करूया. १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर हा या योजनेचा पहिला टप्पा असेल. १२ ते २४ ऑक्टोबर हा या योजनेचा दुसरा टप्पा असेल आणि २५ ऑक्टोबरला कोरोनारुपी राक्षसाचा वध करण्याचा निर्धार करुया, असे मुश्रीफ म्हणाले.

Team Lokshahi News