मुंबई | केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला देशभरातील युवकांकडून विरोध होताना दिसत आहे. देशातील अनेक भागांत यामुळे आंदोलने पेटली आहेत. असे असताना आज लष्कराने यासंबंधित पत्रकार परिषद घेऊन अग्निपथ योजनेची सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला. या योजनेवर दोन वर्षांपासून चर्चा सुरु असून लष्कराचा फायद्याच्या दृष्टीकोनातून विचार करुन ही योजना आणली असल्याची माहिती लष्करातील अतिरिक्त सचिव लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी दिली.

अग्निपथ संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, या योजनेचा उद्देश तरुणांमध्ये उत्साह निर्माण करणे हा आहे. अग्निपथ योजना तरुणांसाठी फायदेशीर असून सर्व अग्निवीरांना सामान्य सैनिकांसारखे फायदे मिळणार आहेत. आजच्या तुलनेत अग्निवीरांना अधिक भत्ते आणि सुविधा मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

निवृत्तीच्या प्रश्नावर पुरी म्हणाले, तिन्ही सेवांमधून दरवर्षी सुमारे १७,६०० सैनिक मुदतपूर्व सेवानिवृत्ती घेतात. निवृत्तीनंतर काय करणार, असे त्यांना कोणी विचारण्याचा प्रयत्न कधीही केलेला नाही. त्यामुळे ही योजना तरुणांच्या भवितव्यासाठी जाणीवपूर्वक टाकलेले पाऊल असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

सचिव पुरी म्हणाले की, देशसेवेसाठी लढत असताना जर अग्निवीरांना प्राणांती आहुती द्यावी लागली तर त्यांना एक कोटी रुपयांची भरपाई मिळणार आहे. ‘अग्निवीर’ म्हणून कार्यरत असताना सियाचीनसारख्या भागात असेल तर सध्याच्या सैनिकांना जे भत्ते आणि सुविधा लागू आहेत, तेच लागू राहणार आहेत. त्यांच्याशी सेवेच्या बाबतीत कोणताही भेदभाव केला जाणार नाही.

भारतीय हवाई दलात अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीचा समावेश करण्याची प्रक्रिया २४ जूनपासून सुरू

या पत्रकार परिषदेत एअर मार्शल एस. के. झा म्हणाले, भारतीय हवाई दलात अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीचा समावेश करण्याची प्रक्रिया २४ जूनपासून सुरू करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया ऑनलाइन होणार असून त्याअंतर्गत नोंदणी सुरू होईल. एक महिन्यानंतर म्हणजे २४ जुलैपासून पहिला टप्प्यातील अग्निवीरांच्या ऑनलाइन परीक्षा सुरु होणार आहेत. डिसेंबरच्या अखेरीस अग्निवीरची पहिली तुकडी हवाई दलात दाखल होईल. बॅचचे प्रशिक्षण ३० डिसेंबरपूर्वी सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

नौदलातील भरती प्रक्रियेची २५ जूनपर्यंत जाहिरात प्रकाशित होणार

नौदलाचे व्हाईस अॅडमिरल डी. के. त्रिपाठी म्हणाले, नौदलातील भरती प्रक्रिया आम्ही सुरू केली आहे. २५ जूनपर्यंत यासंदर्भातील जाहिरातीची माहिती आणि प्रसारण मंत्रालयापर्यंत पोहोचणार आहे. महिनाभरात भरती प्रक्रिया सुरू होऊन पहिला अग्निवीर २१ नोव्हेंबर रोजी प्रशिक्षण संस्थेत उपस्थित असेल, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

भारतीय वायुसेनेतील अग्निपथ योजनेंतर्गत भरतीसाठी तपशील जारी

भारतीय वायुसेनेने अग्निपथ योजनेंतर्गत भरतीसाठी तपशील जारी केला आहे. यात IAF ने म्हटलंय की, अग्निपथ ही सशस्त्र दलांसाठी नवीन मानव संसाधन व्यवस्थापन योजना आहे. या योजनेद्वारे समाविष्ट केलेल्या उमेदवारांना अग्निवीर म्हणून संबोधले जाणार आहे. हवाई दल कायदा 1950 अंतर्गत चार वर्षांसाठी त्यांची भरती केली जाणार आहे. देशाच्या सर्व भागातून अग्निवीर म्हणून उमेदवारांची नोंदणी करण्यासाठी प्रयत्न केले जातील.