मुंबई | महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या मागणीनुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) महाराष्ट्र गट – क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ( जाहिरात क्रमांक 269 / 2021) मधून भरावयाच्या पदसंख्येमध्ये वाढ करण्यात आली आहे. पदसंख्येतील वाढीबाबतचे शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

एकूण 900 पदांकरीता दिनांक 21 डिसेंबर, 2021 रोजी प्रसिद्ध जाहिरातीमध्ये कर सहायक, गट – क संवर्गाकरीता 117 पदे , मंत्रालयीन विभागातील व बृहन्मुंबई शासकीय कार्यालयातील लिपिक – टंकलेखक ( मराठी ) संवर्गाकरीता 473 तसेच लिपिक – टंकलेखक (इंग्रजी) संवर्गाकरीता 79 पदे दर्शविण्यात आली होती. मात्र, शासनाच्या वित्त विभाग तसेच सामान्य प्रशासन विभागाकडून अनुक्रमे 14 जून, 2022 व दिनांक 27 मे, 2022 रोजीच्या पत्रान्वये कर सहायक व लिपिक – टंकलेखक ( मराठी ) व ( इंग्रजी ) संवर्गाकरीता वाढीव पदांचे मागणीपत्र प्राप्त झाल्याने आयोगाकडून वाढीव पदांचे मागणीपत्र विचारात घेत विषयांकित महाराष्ट्र गट – क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२१ मधून भरावयाच्या विविध संवर्गाकरीता एकूण 1695 पदांचा समांतर आरक्षणाबाबतचा तपशील जाहीर करण्यात आला आहे.

यामुळे ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना वाढीव पदसंख्येमुळे चांगली संधी मिळाली आहे. सुमारे दोन वर्षांपासुन कोरोनामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी मिळत नव्हती. त्यामुळे अनेकांना विविध समस्येला तोंड द्यावे लागत होते. मात्र, करोना प्रादुर्भाव कमी झाल्याने आयोगाकडून परिक्षा घेण्यात येत आहेत. यामध्ये वाढीव पदसंख्येसह जाहीर झालेल्या या जाहीरातीमुळे परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, या जाहीरातीमध्ये जाहीर करण्यात आलेल्या पदांमध्ये उद्योग निरीक्षक गट-क उद्योग संचलनालयासाठी-103 पदे, दुय्यम निरीक्षक गट-क राज्य उत्पादन शुल्क 114, तांत्रिक सहायक गट-क विमा संचलनालयासाठी 14, कर सहायक 285, सामान्य प्रशासन विभागात टंकलेखन (मराठी) गट-क 1077, इग्रजी टंकलेखक 102 पदे, असे एकूण 1695 पदासांठी भरती होणार आहे. आरक्षणात काही बदल झाल्यास आयोगाच्या संकेतस्थळावर माहिती दिली जाईल असे आयोगाकडून जाहीर करण्यात आले आहे.