Categories: कृषी

पन्हाळा तालुक्यातील शेतक-यांना नाचणी बियाणे विक्रीतून सात लाखांची कमाई..

कोल्हापूर ।२० जून। कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, शेंडापार्क आणि महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अर्थात महाबीज यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे पन्हाळा तालुक्यातील पंधरा एकर क्षेत्रावर उन्हाळ्यात नाचणी बिजोत्पादनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. राज्यात उन्हाळी हंगामात नाचणी..? तीदेखील बिजोत्पादनाच्या हेतुने उत्पादित करण्याचा अशा प्रकारे राबविण्यात आलेला हा पहिलाच प्रयोग होता. मात्र या प्रयोगासाठी शेतकरी, आत्मा यंत्रणा यांनी घेतलेल्या कष्टाचे चीज झाल्याने अपेक्षेपेक्षा जास्त उत्पादन या प्रयोगातून हाती आले.  

नाचणी या पिकाकडे मुळात गरीबांचे अन्न म्हणून पाहिले जात असल्याने ते खाणे म्हणजे कमीपणाचे किंवा गरीबीचे लक्षण मानले जात होते. त्यामुळे त्याचा खपही म्हणावा तसा होत नव्हता, खप नसल्याने विशेष लक्ष देऊन लागवडही केली जात नव्हती. परिणामी लागवड आणि उत्पादन दोन्ही कमी मिळत होते. 

मात्र, गेल्या काही वर्षांपासून जगभरात होत असलेले नाचणीवरील संशोधन आणि मधुमेह असणारे, कॅल्शियम आणि लोहाच्या कमतरतेने अॅनिमिया सारखे आजार जडलेले रुग्ण तसेच लहान मुलांच्या शारिरीक वाढीसाठी बेबी फुडची निर्मिती करणाऱ्या विविध कंपन्यांनी नाचणीचे उपयोग ओळखुन वापर वाढवल्याने नाचणीची बाजारातील मागणी अभूतपूर्वरित्या वाढलेली दिसुन येत आहे. त्यामुळे आत्तापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या नाचणीला चांगले दिवस येऊ लागलेत.

हीच बाब ध्यानात घेऊन आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या पण नियमित आहारात वापर वाढवणे आवश्यक बनलेल्या नाचणीला लघु तृणधान्य श्रेणीत आणुन त्यांची लागवड, प्रक्रिया, विक्री आणि नित्य आहारात वापर या सर्वच गोष्टींमधे वाढ होण्याच्या उद्देशाने भारत सरकारने सन २०१८ हे वर्ष पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्याचे ठरवले. या पौष्टिक लघु तृणधान्यांच्या लागवडीत वाढ होण्यासाठी सगळ्यात आधी दर्जेदार आणि उत्पादनक्षम बियाणे निर्माण करणे आवश्यक बनल्याने नाचणीचे बिजोत्पादन घेण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येऊ लागले.

नाचणी हे मुख्यतः खरीपातच मोठ्या प्रमाणावर घेतले जाणारे पीक उन्हाळ्यात येईल का याबाबत शंका होती. त्यामुळे उन्हाळी नाचणी बिजोत्पादनासाठी शेतक-यांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांच्या मनातील शंकांचे निरसन करण्यासाठी पन्हाळा तालुका कृषी विभागाचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक पराग परीट, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक विश्वजीत पाटील, महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक नासिर इनामदार, क्षेत्रिय अधिकारी चंद्रकांत शिंदे, फुलसिंग आडे आदींनी नाचणी उत्पादन होऊ शकेल अशा गावांमध्ये जागोजागी शेतक-यांच्या भेटी घेऊन चर्चा केल्या. याद्वारे अठरा शेतकरी उन्हाळी नाचणी प्रात्यक्षिक राबविण्यास तयार झाले. 

प्रात्यक्षिकात सहभागी शेतक-यांना फुले नाचणी या अधिक उत्पादन देणाऱ्या वाणाचे मुलभूत बियाणे, बिजप्रक्रियेसाठी ट्रायकोडर्मा, अॅझोस्पिरिलम आणि स्फुरद विरघळणारे जीवाणू कल्चर, तणनाशक, बुरशीनाशके, किटकनाशके आणि युरिया डीएपी ब्रिकेट्स याचे आत्माकडुन वाटप करण्यात आले. 

प्रयोगशील शेतक-यांनी सुर्यफुल, भुईमूग आणि ऊसाला फाटा देऊन आपल्या पिकाऊ जमिनीत पहिल्यांदाच नाचणी घेण्याचा निश्चय केला होता. या सर्व शेतक-यांना सर्वप्रथम नाचणीची वाफ्यात रोपे करण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. थंडी जास्त लांबल्याने वीस ते बावीस दिवसात पुनर्लागवडीस तयार होऊ शकणा-या रोपांना सव्वीस ते तीस दिवस लागले. मुख्य शेताची मशागत करून शेतक-यांनी एक महिन्याच्या तयार रोपांची दोन ओळीत तीस सेंटिमीटर आणि दोन रोपात दहा सेंटिमीटर अंतर ठेऊन पुनर्लागण केली आणि लगेच पाणी दिले. पुनर्लागण केल्यानंतर वीस दिवसांनी युरिया डीएपी ब्रिकेट्सच्या गोळ्या अर्ध्या मोडून प्रत्येकी चार रोपांच्या मधल्या चौकात खोवून मातीआड केल्या. त्यानंतर दर पंधरा ते सतरा दिवसांनी पाणी देण्यात आले. 

थंडीचा कडाका कमी झाल्यावर आणि युरिया डीएपी ब्रिकेट्स मुळे पिकाची वाढ चांगली झाली. पुनर्लागणीनंतर साधारणपणे नव्वद दिवसांनी पीक फुलोरा अवस्थेत आले. त्यानंतर चाळीस दिवसात पीक काढणीस तयार झाले. शेतक-यांनी नाचणीची परिपक्व बोंडे खुडुन घेऊन उन्हात वाळवली. त्यानंतर मळणी मशिनवर मळणी करुन त्याची उफणणी करुन काडी कचरा विरहित स्वच्छ नाचणी आत्मा, महाबीज, कृषी विभागाचे अधिकारी तसेच राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाच्या शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत पोत्यांमधे भरुन सीलबंद करण्यात आले आणि महाबीजच्या आष्टा येथील बिज प्रक्रिया युनिटकडे पाठवण्यात आले. 

  • “थोडं धाडस, अभ्यासपूर्ण नवीन प्रयोग करण्याची इच्छाशक्ती, सकारात्मक दृष्टीकोन आणि विश्वास याच्या जोरावर आमच्या प्रयोगशील शेतक-यांनी नाचणी पिकाची उत्पादनक्षमता सिद्ध करुन दाखवली आहे. एक किलो बियाणाद्वारे बाराशे ते पंधराशे किलो दर्जेदार बियाणे निर्मितीची किमया निश्चित इतरांना प्रेरणा देणारी आहे. शासनाच्या वतीने साजरे होत असलेल्या पौष्टिक लघु तृणधान्य वर्षानिमित्त पन्हाळा तालुक्याची ही अनोखी भेटच म्हणावी लागेल.”पराग श्याम परीट, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा), कृषी विभाग, पन्हाळा. (संपर्क – ९९२११९०६७१)

प्रती एकरी सर्वसाधारणपणे बारा ते पंधरा क्विंटल नाचणीचे उत्पादन शेतक-यांना मिळाले. पंधरा एकरपैकी आतापर्यंत अकरा एकरवरील नाचणी काढुन झाली आहे. या अकरा एकरमधुन एकुण एकशे चाळीस क्विंटल नाचणीचे उत्पादन मिळाले. उर्वरित चार एकरवरील नाचणी उशिरा रोपलागण केल्याने अद्याप काढणीस तयार झाले नाही. उत्पादित झालेल्या एकशे चाळीस क्विंटलपैकी सत्तर क्विंटल नाचणी बियाणे महाबीजकडे सुपूर्द केले असुन उर्वरित नाचणी काही प्रमाणात घरी खाण्यासाठी आणि कासारी खोरे सेंद्रिय शेती गटाच्या माध्यमातून बियाणे म्हणून स्थानिक पातळीवर विक्रीसाठी ठेवले आहे.

बाजारभावाहून वीस टक्के ज्यादा दर आणि महाराष्ट्र राज्य कृषी विभागाच्या पौष्टिक लघु तृणधान्य विकास योजनेतून प्रोत्साहनपर अनुदान अशा एकत्रितपणे शेतक-याकडुन खरेदी केलेल्या नाचणी बियाणाची किंमत शेतक-यांच्या खात्यावर वर्ग करण्याचे काम सध्या सुरू आहे. एकरी साठ ते पासष्ट हजार रुपयांचे उत्पन्न नाचणी बियाणे विक्रीतुन मिळण्याची आशा आहे. शिवाय नाचणीचा बोंडे काढुन झाल्यावर शिल्लक राहिलेला ओला चारा दोन हजार रुपये टन या दराने शेतक-यांनी विक्री करुन त्याद्वारेही एकरी आठ ते दहा हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. 

  • आत्माच्या तालुका अधिका-यांनी विश्वास दिल्यामुळे मी उन्हाळ्यात नाचणी करण्याचे धाडस केले. २७ गुंठ्यात मला १२४१ किलो नाचणी बियाणाचे उत्पादन मिळाले. चार साडेचार महिन्यात किमान साठ ते पासष्ट हजार रुपये नाचणी बियाणे विक्रीतून मला मिळणार आहेत. तर नाचणीची बोंडे खुडुन राहिलेली हिरवी वैरण आठ हजार रुपयांना विकली. सत्तावीस गुंठ्यात साडेचार महिन्यात नाचणी पिकाने मला सत्तर हजार रुपये मिळवुन दिलेत. माझा उन्हाळ्यातला सफल झालेला प्रयोग बघुन आता खरीपात अनेक शेतक-यांनी आपल्या चांगल्या शेतजमिनीत देखील नाचणी पीक घेतले आहे.गणपती साधु पाटील, किसरुळ ता. पन्हाळा (संपर्क – ८६९८९८७२०६)

आतापर्यंत दुर्लक्षिल्या गेलेल्या या एका महत्वाच्या पिकाला पुन्हा प्रकाशझोतात आणण्यासोबतच या पिकाच्या उत्पादनाद्वारे शेतक-यांना अधिक फायदा मिळवुन देण्याच्या आत्मा, महाबीज आणि एनएआरपीच्या पथदर्शी उपक्रमाचे सध्या राज्यभर कौतुक होत आहे. पन्हाळ्यातील या उन्हाळी नाचणीच्या प्रयोगावरुन प्रोत्साहित झालेल्या जिल्ह्यातील शेतक-यांच्या माध्यमातून यंदा खरीपातही पन्हाळ्यासह शाहूवाडी, राधानगरी, आजरा आणि भुदरगड या तालुक्यांमधे शंभर एकरांवर बिजोत्पादनाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. तसे नियोजन कृषी विभाग, आत्मा आणि महाबीजद्वारा करण्यात आले आहे. 

By Lokshahi.News

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: kolhapur Panhala Panhala AATMA YANTRANA red millet नाचणी बीजोत्पादन