नवी दिल्ली | पीएम किसान योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा सहभाग वाढवणे आणि गरजूंपर्यंत लाभ पोहचवणे या उद्देशाने सरकारने पावले उचलली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना स्वतः कुठेही न जाता घरबसल्या या योजनेत आपले नाव नोंद करता येणार आहे. ही सुविधा सरकारने मागील काही महिन्यांपासून सुरू केली असून यामुळे शेतकऱ्यांना नोंदणी करणे सोपे झाले आहे. योजनेत नोंदणी झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रूपये मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
अशी करा नोंदणी –
प्रथम PM किसान योजनेच्या या https://pmkisan.gov.in/ अधिकृत वेबसाईट ला भेट द्या, याठिकाणी फार्मर्स कॉर्नरवर जा, या ठिकाणी नवीन नोंदणीच्या https://pmkisan.gov.in/RegistrationForm.aspx या पर्यायावर क्लिक करा, आधार कार्ड नंबर आणि समोरील कॅप्चा कोड टाकून पुढे जा.
पूर्वी नोंदणी झाली असल्यास स्क्रीनवर तसा संदेश दाखवला जातो.
पूर्वी नोंदणी झाली नसल्यास नवीन नोंदणीसाठी विचारणा केली जाते.
याठिकाणी Yes बटणावर क्लिक केल्यास अर्ज उघडला जातो.
येथे राज्य निवडून पुढील योग्य ती माहिती भरावी लागते. यामध्ये गावाचे, तालुक्याचे, जिल्ह्याचे आणि स्वतःचे नाव भरावे लागते. त्यानंतर कॅटेगिरी मधील पर्याय निवडावे लागतात. पुढे जमीन धारण केलेले क्षेत्र, बॅंक खात्याची माहिती, आयएफएससी कोड, खाते क्रमांक भरावा लागतो. अकाऊंट नंबर टाकल्यानंतर सब्मिट फॉर आधार ऑथेंटिकेशन असा पर्याय येतो. त्यावर क्लिक केल्यानंतप मोबाईल नंबर, जन्मतारिख, वडिलांचे नाव अशी माहिती भरावी लागते. ही माहिती भरल्यानंतर सातबारा वैयक्तिक आहे की सामायिक याची माहिती द्यावी लागते. त्यानंतर जमीनीचे तपशील, सर्वे नंबर, (खासरा नंबर-उत्तर भारतातील जमीनधारकांसाठी, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी या ठिकाणी ‘शून्य’ टाकावे) भरल्यानंतर अॅड या पर्यायावर क्लिक करावे. इथपर्यंत सर्व माहिती दिल्यानंतर पुढे येणारे घोषणा पत्र लिहून द्यावे लागते. यामध्ये ‘मी ही माहिती खरी असल्याचे घोषणा पत्र लिहून देत आहे, अशी माहिती येते. त्यानंतर पुढे क्लिक करून सेव्ह पर्याय दाबल्यास आपला अर्ज पोर्टवर नोंदणीसाठी पुढे जातो.
यापुढे अर्जावरील प्रक्रियेची जबाबदारी तलाठी कार्यालयावर येते. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर शेतकऱ्याने भरलेल्या अर्जाची पडताळणी करण्याची जबाबदारी तलाठ्यांवर येते. त्यामुळे अर्ज भरल्यानंतर शेतकऱ्यांनी आपला सातबारा, खाते पुस्तकाची प्रत, आणि आधार कार्डची झेरॉक्स तलाठी कार्यालयात जमा करावी. तसेच त्याची पोच घ्यावी. कालांतराने तलाठी कार्यालयाकडे पीएम किसान योजनेसाठी अर्ज केल्याचा पुरावा म्हणून त्याचा उपयोग होऊ शकतो. अशा प्रकारे शेतकऱ्यांना स्वतः या योजनेत नोंदणी करून ६००० रूपयांचा लाभ घेता येतो.