farmer
नवी दिल्ली। कृषिकर्ज घेणाऱ्या देशातील ७ कोटी शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला असून कृषि कर्जावर केवळ ४ टक्के व्याज आकारले जाणार असल्याचे स्पष्ट केलयं. केंद्रीय कृषि मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी याबाबत माहिती दिलीय. तसेच कॅबिनेट मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबत प्रेस कॉन्फरन्समध्येही माहिती दिली आहे.
केंद्र सरकारने किसान क्रेडीट कार्ड़च्या माध्यमातून कृषिकर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना हा लाभ देण्याचे निश्चित केले आहे. देशात लॉकडाऊन नसता तर शेतकऱ्यांना त्यांनी घेतलेले पीककर्ज ३१ मार्चपर्यंत ४ ते ७ टक्के व्याजाने परतफेड करावे लागले असते, मात्र सरकारने या कर्जफेडीची मुदत वाढवून ती ३१ मे केली होती. त्यात आता पुन्हा वाढ करण्यात आली असून ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ४ टक्यांनी कर्जफेड करण्यासाठी शेतकऱ्यांना वाढीव अवधी मिळाला आहे. यापूर्वीही शेतकऱ्यांनी वेळेत कर्जफेड केल्यास हा लाभ मिळत होता. परंतु सध्या अनेक शेतकऱ्यांची आर्थिक कुवत ढासळल्याने ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
सरकारने याअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जाच्या व्याजात २ टक्के आणि कर्जफेडीच्या वेळी ३ टक्क्यांचा फायदा मिळेल. भारतसरकारकडून शेतकऱ्यांना ९ टक्के व्याजदराने कर्ज मिळतं. यात बँकेच्या व्याजात सरकार २ टक्के सुट देईल. तसेच वेळेवर कर्ज फेडल्यास ३ टक्क्यांची सुट मिळेल. अशाप्रकारे शेतकऱ्यांना ४ टक्क्याने ३ लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे, अशी माहिती प्रकाश जावडेकर यांनी दिलीय.
किसान क्रेडीट कार्डद्वारे कर्ज घेताना शेतकऱ्यांच्या किमान एक हेक्टर जमिनीवर दोन लाखापर्यंत कर्ज मिळते. प्रत्येक बॅंकेची कर्जमर्यादा वेगळी असती. सहकारी बॅंका, ग्रामीण बॅंका, राष्ट्रीयीकृत बॅंका यासर्वांच्या माध्यमातून किसान क्रेडीट कार्ड व्दारे कर्ज मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कार्डव्दारे शेतकरी कधीही पैसे काढू शकतात.
दरम्यान, सरकारने पूर्वीच्याच योजनेला शब्दात फिरवून शेतकऱ्यांना मुर्ख बनवण्याचा प्रकार केल्याची टीका यानिमित्ताने शेतकरी वर्गाने केलीय. तसेच विरोधकांनीही ही योजना फसवी असल्याचे म्हणटले आहे.