Categories: गुन्हे बातम्या

रिपब्लिक टिव्हीच्या बनावट टीआरपी रॅकेटचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश

मुंबईरिपब्लिक टिव्हीच्या बनावट टीआरपी रॅकेटचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला असून बीआरसी आणि हंसा या कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांकडून हे रॅकेट चालवले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याबरोबरच फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या चॅनेलचाही या बनावट टीआरपी प्रकरणात समावेश असल्याचे दिसून आले आहे. मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली आहे. 

रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढवण्यासाठी काही लोकांना पैसे देऊन दिवसदिवसभर हे चॅनेल सुरू ठेवले जात असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. यासाठी प्रत्येकाला किमान ४०० ते ५०० रूपये दिले जात होते. यामुळे चॅनेलच्या टीआरपीत मोठी वाढ केली जात होती. वाढीव टीआरपीच्या माध्यमातून संबधित चॅनेलला मिळणाऱ्या जाहिरातींचीही आता यामुळे चौकशी होणार आहे.  

याप्रकरणी आता रिपब्लिक चॅनलच्या प्रवर्तकांचीही चौकशी केली जाणार आहे. तर हंसा कंपनीच्या एका कर्मचाऱ्यालाही ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून २० लाख रूपयांची रोकड तसेच बॅंकेत साडेआठ लाख रूपये आढळल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ताब्यात घेतलेल्या कर्मचाऱ्याने या रॅकेटमध्ये आणखी कोण कोण सहभागी होते याची माहिती दिली असून पोलिस सर्वांचा शोध घेत आहेत. 

बीआरसी (BARC) कडून देशभरातील टीव्ही चॅनेलचा टीआरपी मोजला जातो. यासाठी देशभरात ३० हजार बॅरोमिटर्स लावण्यात आली आहेत. यापैकी २ हजार एकट्या मुंबईत आहेत. परंतु ती कुठे लावण्यात आली आहेत याची माहिती गोपनिय राखली जाते. तर हंसा या कंपनीला या बॅरोमिटर्सच्या देखभालीचे कंत्राट देण्यात आले आहे. त्यामुळे या कंपनीतील माजी कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने हे रॅकेट चालवण्यात येत असल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे. 

Team Lokshahi News