Categories: आरोग्य सामाजिक

इचलकरंजी शहरात कोरोनाबाबतच्या अफवांना उधाण, पालिका प्रशासन मात्र सुस्त!

इचलकरंजी | प्रविण पवार | इचलकरंजी शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागलीय. यामुळे शहरात सोशल मिडीयावरून अफवांचे प्रमाण देखील वाढू लागले आहे.  इचलकरंजी शहर मंगळवारपासून चार दिवसांसाठी संपूर्णतः लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची अशीच अफवा सोशल मिडीयावर पसरल्याने एकच खळबळ उडाली. यामुळे नागरिकांच्यात मोठी संभ्रमावस्था निर्माण झाली होती. अखेर याबाबत खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनाच खुलासा करावा लागला. जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या खुलाशानंतर मात्र शहरवासियांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. 

इचलकरंजी शहर लॉकडाऊन केले जाणार असल्याची अफवा सोशल मिडीयावर सकाळपासून पसरली होती. परंतु याची इचलकरंजी शहर प्रशासन दखल न घेतल्याने नागरिकांच्यात संभ्रमावस्था निर्माण झाली होती. प्रत्येक दिवशी रुग्णांच्या संख्येमध्ये भर पडत असतानाही प्रशासन याबाबत गांभीर्याने घेत नसल्याचेच यामुळे दिसून आल्याने नागरिकांच्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

इचलकरंजी शहरात गेले आठवडाभर कोरोना रुग्णांच्याबाबत व्हाट्सअप, ट्विटर, फेसबूक, इंस्टाग्राम या माध्यमाद्वारे अनेक अफवा पसरवण्याचे काम सुरू आहे. दिवसातून अनेकदा सोशल मीडियावर अमुक परिसरांमध्ये रुग्ण सापडले अशा खोट्या बातम्या प्रसारित होत आहेत. परंतु याबाबत प्रशासन गांभीर्याने घेत नसून अशा अफवा पसरणाऱ्यांचे आणखी फावते आहे.

आज सकाळपासून इचलकरंजी शहरामध्ये मंगळवार दिनांक ३० जून ते शुक्रवार दिनांक ३ जुलैपर्यंत संपूर्ण शहर लॉकडाऊन करण्यात येणार आहे अशा आशयाचे खोटे संदेश व्हायरल झाले. यामुळे इचलकरंजी शहर व परिसरामध्ये नागरिक उलट-सुलट चर्चा करत होते तर उद्योजक व हातावर पोट असणारे छोटे व्यापारी यांच्यामध्येही मोठी खळबळ माजली होती. 

याबाबत सतर्क नागरिकांनी व्हाट्सअप ग्रुप वरील सदर पोस्टबाबत सत्यता पडताळण्याचा प्रयत्न केला असता पालिकेच्या कोणत्याही जबाबदार अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी यांनी याचा खुलासा केला नाही. अखेर दुपारनंतर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी स्वतः याबाबत खुलासा करून लॉकडाऊन होणार नसल्याचे स्पष्ट केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या खुलाशानंतर नागरिकांमधील संभ्रम दूर झाला असला तरी इचलकरंजी प्रशासनाने मात्र याची गांभिर्याने दखल घेतली नसल्याने नागरिकांच्यातून संताप व्यक्त होत आहे.

Team Lokshahi News