Categories: Featured

हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी

वर्धा। वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांडातील पीडित शिक्षिकेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी (Hinganghat Burn Victim Teacher Death) ठरली. हृदयविकाराचा धक्का आल्याने आज पहाटे (सोमवार १० फेब्रुवारी) २४ वर्षीय पीडितेची प्रकृती खालावली होती, त्यानंतर सकाळी सहा वाजून ५५ मिनिटांनी तिने नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. पीडितेवर उपचार करणारे डॉ. राजेश अटल यांनी मेडिकल बुलेटिन घेऊन तिच्या मृत्यूची दुःखद बातमी सांगितली.

पीडितेला औषधं देऊन हृदयाचे ठोके आणि रक्तदाब वाढवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. काल संपूर्ण रात्रभर तिला वाचवण्याचे प्रयत्न सुरु होते. संसर्गामुळे तिच्या रक्तपेशी, रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं होतं. त्यामुळे मेंदू, फुफ्फुसांवरही परिणाम झाला होता, असं डॉक्टरांनी सांगितलं. ‘सेप्टीसेमिक शॉक’ असं तिच्या मृत्यूचं वैद्यकीय भाषेतील कारण डॉक्टरांनी सांगितलं. पीडितेचं पार्थिव पोलिसांकडे सुपूर्द केलं जाणार आहे.
पीडितेला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने शनिवारपासूनच व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. अखेर डॉक्टरांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आणि आठवड्याभरापासून सुरु असलेली तिची मृत्यूशी झुंज संपली.

पीडितेला जाळणारा आरोपी विकी नगराळेला 20 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांनी दिली. घटनेनंतर नागरिकांमधील संताप लक्षात घेत न्यायालयाने रात्री 12.25 वाजता या प्रकरणावर सुनावणी घेतली होती. शनिवारी आरोपीला १२ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

काय आहे हिंगणघाट जळीतकांड प्रकरण?

३० वर्षीय शिक्षिका दररोज सकाळी कामावर जाताना आरोपी विकेश उर्फ विकी नगराळे तिचा पाठलाग करायचा. सोमवार ३फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे शिक्षिका कॉलेजमध्ये शिकवायला जात असताना आरोपी तिचा पाठलाग करत होता. हिंगणघाट शहरातील एका चौकात येताच सकाळी ७.१५ वाजताच्या सुमारास आरोपीने तिच्यावर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ती २० ते ३० टक्के भाजली होती. आरोपी हा शिक्षिका राहत असलेल्या दारोडा गावातीलच आहे.

आरोपीला कठोर शिक्षा मिळावी म्हणून खटला फास्ट ट्रक कोर्टात चालवण्याची ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. हा खटला ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी लढवावा अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांनी केली होती. त्यानुसार उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Team Lokshahi News