मुंबई। मिसेस मुख्यमंत्री अर्थात रश्मी ठाकरे यांनी ‘सामना’च्या संपादकपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्याच अग्रलेखात भाजपाला तडाखा दिलाय. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा ‘भाजपचे दादामियां’ असा उल्लेख करत दादामियां ‘इतिहास पुरुष’ कधीपासून झाले? असा सवाल ‘सामना’तून विचारला आहे.
भाजपचे दादामियां ‘इतिहास पुरुष’ कधीपासून झाले? त्यांना इतिहासाचे उत्खनन करण्याची इतकीच आवड असेल, तर पंचवीस वर्षांपूर्वी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ केल्याचे त्यांच्या लक्षात यायला हवे होते, अशा कानपिचक्या अग्रलेखातून लगावण्यात आल्या आहेत. ‘दादामियां’सारख्या लोकांनी औरंग्याची पिशाच्य कितीही उकरुन काढली, तरी महाराष्ट्राची शांतता भंग पावणार नाही, हे दादामियांनी पक्के लक्षात ठेवावे. असे अनेक दादामियां गोधड्या भिजवत होते, तेव्हा शिवसेना हिंदुत्व आणि राष्ट्रकार्यासाठी छातीचा कोट करुन लढत होती. दादामियां हे पक्के ध्यानात ठेवा!’ असा थेट इशाराच ‘सामना’तून चंद्रकांत पाटलांना देण्यात आलाय.
आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे वंशज आहोत, औरंग्याचे नाहीत. त्यामुळे औरंगाबादचे नामांतर झालेच पाहिजे. आपण नक्की कोणाचे वंशज आहोत, हे त्यांनी सांगायलाच पाहिजे. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची विटही रचली नाही, ना सावरकरांना भारतरत्न दिला. अयोध्येत रामाचं मंदिर सर्वोच्च न्यायालयाच्या कृपेने उभे राहत आहे. आम्हाला महाराष्ट्रात शांतता हवी आहे, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील ही मंडळी जे बोलतात आणि करतात त्यातून त्यांचे वैफल्य दिसून येते. दादांची पावलं फडणवीसांच्या पावलावर पडत आहेत. जिथे नको तिथे जीभ टाळ्याला लावत आहेत, अशी बोचरी टीकाही अग्रलेखातून भाजपच्या नेत्यांवर करण्यात आली आहे.