Categories: राजकीय

मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजेंची दिल्लीत शरद पवारांशी चर्चा; मांडली ‘ही’ ठोस भूमिका..!

कोल्हापूर | मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्य न्यायालयाने तात्पुरती स्थगिती देण्याचा घेतल्याने मराठा समाजाच्या भावना तीव्र झाल्या आहेत. यामुळे आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक आंदोलन करण्याचा इशाराही मराठा समाजाच्यावतीने देण्यात आला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून दिल्लीतही आवाज उठविण्यात येत असून राज्यसभा खासदार राजीव सातव यांनी संसदेत हा प्रश्न मांडला आहे. तर, आता खासदार संभाजीराजे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली आहे.  

खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांची भेट घेतली. यासंदर्भातील माहिती खा. संभाजीराजे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली असून ‘’मराठा आरक्षणा विषयी चर्चा करण्यासाठी शरद पवार साहेबांनी मला निमंत्रित केले होते. त्याप्रमाणे दिल्ली येथील त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. “यावेळी मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नी गट, तट, पक्ष न पाहता सर्वांनी एकत्र आलं पाहिजे हिच भूमिका प्रभावीपणे मांडली.” तसेच अनेक पर्यायांच्यावर चर्चा करण्यात आली. या पर्यायांवर सखोल अभ्यास करून उपाय योजना करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.”, असे सांगितले आहे.

सरकारी नोकऱ्या तसेच शैक्षणिक प्रवेशात मराठा आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने २०१८ साली बनविलेल्या कायद्याच्या अंमलबजावणीस सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी तात्पुरती स्थगिती दिली. ज्यांना यापूर्वी या आरक्षणाचा लाभ मिळाला आहे, त्याला धक्का लागणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. यानंतर आता मराठा आरक्षणावरून राजकारण सुरू झालं आहे. शरद पवार यांनी, मराठा आरक्षणात केंद्र आणि राज्य सरकार असा वाद आणण्याची गरज नाही, असे स्पष्ट मत मांडताना तोडगाही सूचवला. मात्र, पवारांनी सूचवलेला पर्याय किंवा तोडगा योग्य नसल्याचं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून संसदेत चर्चा करण्यात यावी यासाठी काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांनी चर्चेची नोटीस दिली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सभागृहामध्ये शून्य प्रहरात चर्चा करण्यात यावी अशी मागणी राजीव सातव यांनी केली आहे.

मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात गोलमेज परिषद
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने मराठा समाजातील तरुणांचे भविष्य अंधकारमय झाले आहे. यामुळे पुन्हा एकदा मराठा समाजाची ताकद दाखविण्यासाठी, २३ सप्टेंबरला कोल्हापुरात राज्यस्तरीय गोलमेज परिषदेचे आयोजन केले आहे. यामध्ये राज्यातील ५० हून अधिक संघटना सहभागी होणार असल्याची माहिती मराठा आरक्षण संघर्ष समितीचे नेते सुरेश पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

Team Lokshahi News