Categories: Featured कृषी गुन्हे

सांगलीच्या जिल्हा अधिक्षक कृषि अधिकाऱ्यांचा प्रताप; चक्क पत्नीच्या नावेच कंपनी स्थापून सुरू केला ‘हा’ प्रकार…

Lokshahi.News
सांगली | सांगलीच्या जिल्हा अधिक्षक कृषि अधिकाऱ्यांनी चक्क पत्नीच्या नावेच कंपनी स्थापन करून कृषिविभागात घोटाळा केल्याने त्यांच्यासह लिपिक आणि कंपनीच्या संचालकांचीही कसून चौकशी करण्यात आली आहे. त्याचा अहवाल लवकरच वरिष्ठांकडे सादर केला जाणार असल्याची माहिती चौकशी पथकाच्या सूत्रांनी दिली आहे. कंपनीच्या माध्यमातून बाजारभावापेक्षा अधिक किंमतीने तापमापक यंत्र आणि बॅग खरेदी करून घोटाळा केल्याचे सांगितले जात आहे.

कृषी विभागात साहित्य खरेदीसाठी सांगली जिल्हा अग्रो-फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करण्यात आली आहे. त्यात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांची पत्नीच संचालक आहे. यामध्ये आत्मा विभागातील तालुका तंत्र व्यवस्थापक मुकुंद जाधवर आणि रविकरिण पवार यांच्या घरातील सदस्यांचाही समावेश आहे. कायद्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांना आपल्या कुटूंबातील व्यक्तीला असा लाभ देता येत नाही. मास्तोळी यांनी हा कायदा बासनात गुंडाळून आपल्या अधिकारांचा गैरवापर करत कोरोना काळात ताप तपासणीसाठीची यंत्रे खरेदी केली. बाजारातील किंमतीपेक्षा अधिक दराने ही खरेदी झालेली आहे. बुकलेट संच, प्रशिक्षणासाठी बॅगांची खरेदी असे विविध प्रकारचे साहित्य या कंपनीकडून खरेदी करण्यात आले आहे. 

हे ही वाचा : शेतकरी बंधूनो जाणून घ्या पंतप्रधान पीक विमा योजना आणि तिचे महत्व…
पीएम किसान योजनांबाबत कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे महत्वाचे निर्देश..!

सुयोग औंधकर यांनी माहिती अधिकार कायद्यातून ही कागदपत्रे मिळवत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. दरम्यान, गेल्या दोन दिवसापासून हे पथक सांगलीमध्ये विविध चौकशीसाठी होते. त्यावेळी सांगली जिल्हा अग्रो-फार्मर प्रोड्युसर कंपनीद्वारे केलेल्या खरेदीचीही चौकशी करण्यात आली. यामध्ये जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी बसवराज मास्तोळी यांच्यासह कार्यालयातील सर्व लिपीकांसह या कंपनीत असलेल्या संचालकांची कसून चौकशी करण्यात आली आहे. या घोटाळ्यात समाविष्ट असणारी साखळी लवकरच समोर येण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. यानिमित्ताने वरिष्ठ अधिकारी लाखो रूपयांचा गैरव्यवहार करत असल्याची चर्चाही दबक्या आवाजात सुरू आहे.

याबरोबरच आत्मा अंतर्गत कृषि सलंग्न प्रात्यक्षिके आणि नाविन्यपूर्ण उपक्रम याबाबीखाली शेततळ्यातील मत्सपालन या योजनेत देखील घोटाळा केला आहे. यासाठी लागणारा मत्सबीज पुरवठा याच अधिकाऱ्यांच्या कुटूंबातील व्यक्ती संचालक असलेल्या कंपनीकडून करण्यात आला आहे. बाजारभावापेक्षा अधिक दराने पुरवठा केल्याचे तसेच आवश्यकता नसताना लोकवाट्याच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून पैसे उकळल्याचे एका शेतकऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे.

बसवराज मास्तोळी यांची कोल्हापूर जिल्ह्यातील कारकीर्द ही अशाच प्रकारे वादग्रस्त ठरल्याने त्यांची सांगली येथे बदली करण्यात आल्याचे सांगितले जाते. दरम्यान या खरेदीची सर्व चौकशी झाली असून त्याचा अहवाल लवकरच तयार केला जाणार आहे. अहवाल तयार झाल्यानंतर सबंधित वरिष्ठांकडे सादर करून योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. असे असले तरी संबंधित, तसेच कर्मचारी यांचे वेतन, आणि त्यांची खाजगी मालमत्ता यांची उच्चस्तरीय चौकशी होणे अधिक गरजेचे आहे.

Team Lokshahi News