Categories: Featured आरोग्य सामाजिक

कोरोनामुळे राज्य संकटात: आईच्या पार्थिवाला अग्नी देऊन प्रांताधिकारी कर्तव्यावर हजर…

शिर्डी।दिवसेंदिवस कोरोनाचं संकट गहिरं होत असताना, नगर जिल्ह्यातील संगमनेरचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी सामाजिक भान जपत नवा आदर्श सर्वांसमोर ठेवलाय. स्वत:च्या आईचा मृत्यू झाल्यानंतरही अवघ्या दीड दिवसात प्रांताधिकारी मंगरुळे आपल्या कर्तव्यावर हजर झालेत. त्यांच्या या कार्यतत्परतेची दखल खुद्द अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी घेतली असून त्यांच्या कार्याची दखल घेतलीय. 

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर मोठी जबाबदारी आहे. सरकारी अधिकारी-कर्मचारी या बिकट परिस्थितीत आपलं काम चोख बजावत आहेत. 

या परिस्थितीत डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या मातोश्रीचं निधन झालं. यावेळी मंगरुळे यांनी आपल्या सहकारी अधिकाऱ्यांना जबाबदारीचे वाटप करुन, स्वतःच्या खासगी वाहनाने जळगावातील मूळगावी पोहचले. तेथे मातोश्रीचं अंत्यदर्शन घेऊन पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. अंत्यसंस्कारानंतरचे धार्मिक विधी करुन डॉ. शशिकांत मंगरुळे  पुन्हा दीड दिवसात गुरुवारी (२६ मार्च) कर्तव्यावर हजर झाले. त्यांच्या या समाजनिष्ठेचे सध्या तोंडभरून कौतुक होत आहे. तसेच महाराष्ट्र सरकारनेही त्यांच्या या कार्याची दखल घेतली आहे.

Team Lokshahi News