सांगली | सांगली जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. जिल्ह्यातील लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांमध्ये तब्बल १४ हजार २६७ लाभार्थी बोगस असल्याचे तपासणीत स्पष्ट झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या अपात्र लाभार्थ्यांकडून आता ११ कोटी ३५ लाख रुपये वसूल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून तातडीने निधी परत न करणाऱ्या बोगस लाभार्थ्यांवर थेट कायदेशीर कारवाईचा इशारा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिला आहे.
सांगली जिल्ह्यात पीएम किसान योजनेअंतर्गत ४ लाख ५८ हजार १९० लाभार्थ्यांची नोंद आहे. यापैकी १ हजार ६६० अपात्र लाभार्थी व १२ हजार ६०७ आयकर भरणारे अपात्र, अशा १४ हजार २६७ बोगस लाभार्थ्यांची यादी सरकारने पोर्टलवर जाहीर केली आहे. या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर सरकारकडून ११ कोटी ३५ लाख रूपये रक्कम जमा झाले आहेत. ही रक्कम संबंधिताकडून तात्काळ केली जाणार आहे. तशा नोटिसा अपात्र लाभार्थ्यांना पाठवण्याचे काम सुरू असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले आहे.
अपात्र लाभार्थ्यांची संख्या व कंसात त्यांच्या खात्यावर जमा झालेली रक्कम (तालुकानिहाय) –
आटपाडी १४ (६८ हजार रुपये), जत ४८ (३ लाख ४ हजार रुपये), कडेगाव १५९ (७ लाख १० हजार रुपये), कवठेमहांकाळ १२२ (५ लाख ५० हजार रुपये), खानापूर ३९ (२ लाख २२ हजार रुपये), मिरज ७६३ (४५ लाख २४ हजार रुपये), पलूस १८८ (८ लाख ५८ हजार रुपये), शिराळा २२ (१ लाख १२ हजार रुपये), तासगाव १८४ (९ लाख ८६ हजार रुपये), वाळवा १२१ (६ लाख २० हजार रुपये), अशा एकूण १ हजार ६६० अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यांवर ८९ लाख ५४ हजार रुपये रक्कम जमा झालेली आहे.
आयकर भरणाऱ्या अपात्र लाभार्थ्यांची संख्या व कंसात त्यांच्या खात्यावर जमा झालेली रक्कम (तालुकानिहाय) –
आटपाडी १५४८ (१ कोटी २४ लाख ८४ हजार रुपये), जत १२०६ (९७ लाख ८८ हजार रुपये), कडेगाव १६०३ (१ कोटी ४४ लाख ६६ हजार रुपये), कवठेमहांकाळ ७१३ (५२ लाख ५४ हजार रुपये), खानापूर १६५६ (१ कोटी ३३ लाख ६२ हजार रुपये), मिरज १६४४ (१ कोटी २८ लाख १० हजार रुपये), पलूस ८६२ (७२ लाख ७६ हजार रुपये), शिराळा ७५१ (६९ लाख ४० हजार रुपये), तासगाव ११३३ (८७ लाख ५० हजार रुपये), वाळवा १४९१ (१ कोटी ३४ लाख ७६ हजार रुपये), अशा एकूण १२ हजार ६०७ आयकर भरणाऱ्या अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरील १० कोटी ४६ लाख ६ हजार रुपये वसूल केले जाणार आहेत.
पीएम किसान योजनेत देशभरातील तब्बल ११.१७ कोटी शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे. तर आत्तापर्यंत या योजनेचे ६ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. ज्या शेतकऱ्यांना नाव नोंदणी करून देखील लाभ मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना देखील या योजनेत सामावून घेण्यासाठी सरकारकड़ून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना घरबसल्या स्वतः आवश्यक त्या कागदपत्रांच्या आधारे नोंदणी करण्याचीही सोय उपलब्ध करून दिली आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, ज्या शेतकऱ्यांची नोंदणी होऊन सुध्दा पैसे मिळत नाही अशा शेतकऱ्यांनी खालील लिंकच्या आधारे पीएम किसान योजनेचा लाभ घ्यावा.
यासाठी योजनेचे अधिकृत संकेतस्थळ www.pmkisan.gov.in/ यावर जावे. अधिकृत संकेतस्थळावर गेल्यानंतर होम पेज ओपन होईल. या होम पेजवर Farmers Corner हा पर्याय दिसेल यात New farmer Registraion हा पर्याय आहे. येथे शेतकरी स्वत नोंदणी करू शकतात. तसेच स्वतः नोंदणी केलेले शेतकरी Status of Self Registered/CSC Farmers स्वत: नोंदणी आणि सीएससी च्या पर्यायावर क्लिक करून आपली नोंदणी झालेली आहे की नाही हेही तपासू शकतील. याठिकाणी क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. या पेजवर शेतकरी आपले आधार नंबर, इमेज कोड, कॅच्चा कोड यादी गोष्टी भराव्यात. सर्व माहिती भरल्यानंतर सर्च या बटनवर क्लिक करा. यानंतर आपल्याला पीएम किसान सन्मान निधी योजनेची सद्य स्थितीची माहिती मिळेल.