Categories: Featured गुन्हे

वाळू तस्करांनी ट्रक पळवून नेताना पाडली तहसील कार्यालयाची भिंत… ट्रक सोडून झाले पसार

सांगली वाळूतस्करी प्रकरणी तहसीलदार कल्पना ढवळे यांनी कारवाई करून ताब्यात घेतलेला ट्रक गुरुवारी रात्री वाळूतस्करांनी पळण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. यावेळी अंदाज चुकल्याने हा ट्रक तहसील कार्यालयाच्या भिंतीला धडकून भिंत कोसळलीय. या प्रकारानंतर संबंधितांनी धूम ठोकली असून तासगाव पोलिसांनी याप्रकरणी ट्रक मालक निलेश उर्फ चिक्या नरसू फाकडे व वाहन चालक सोमनाथ बाळू लोहार या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तहसिलदार कल्पना ढवळे यांनी सोमवारी नागाव (नि) पाचवा मैल-सांगली रोड येथून विना परवाना वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकला (क्र. एम एच ४३ यु ९४४९) पकडले होते. हा ट्रक तलाठी नागाव व तलाठी ढवळी यांनी तहसिल कार्यालय आवारात आणून लावला होता. मात्र, गुरुवारी मध्यरात्री पावणेदोन वाजण्याच्या दरम्यान, निलेश फाकडे व बाळू लोहार यांनी तहसिल कार्यालयाच्या आवारातून ट्रक पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रक पाठीमागे घेत असताना तहसिल कार्यालयाच्या समोरील कंपाऊंडच्या भिंतीवर धडकून भिंत कोसळली. या प्रकाराने घाबरलेल्या दोघांनीही ट्रकमधून उड्या टाकून पळ काढलाय. 

याप्रकरणी, शासकीय खनिजाची चोरी करून पळवून नेणेचा प्रयत्न करणे व शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी संबंधितावर कलम ३५३ नुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची फिर्याद तहसील कार्यालयातील सुरक्षा रक्षक सतीश उपाध्ये यांनी दिली असून पुढील तपास सुरू आहे.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: car insurance truck insurance vehicle insurance चोरी वाळू वाळू तस्कर सांगली तहसिल