Categories: Featured

संजय राऊत यांचे शरद पवारांसाठी ‘हे’ आहे ‘खास मिशन’

मुंबई। ६ डिसेंबर। शिवसेना अध्यक्ष उध्दव ठाकरे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवल्यानंतर शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी नवीन मिशन हाती घेतले आहे. संजय राऊत यांचे हे नवीन मिशन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी असून पवार यांना ‘राष्ट्रपती’ बनवण्याचे आहे.    

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांना राष्ट्रपती करण्यासाठी महाराष्ट्रात हालचाली सुरु झाल्यात. आगामी राष्ट्रपती निवडणुकीत बिगरभाजप दलाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार हे शरद पवार असावेत, अशी आग्रही भूमिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. शरद पवार यांनी राष्ट्रपतीपद भूषवावं यासाठी संजय राऊत त्यांची सहमती मिळवण्यासाठी मनधरणी करणार असल्याचे समजत आहे. 

सध्या लोकसभेत भाजपकडे बहुमत आहे, तर राज्यसभेत भाजप बहुमतापासून दूर आहे. त्याचा फायदा उठवत आगामी राष्ट्रपती निवडणुकीत बिगरभाजपची राज्य असलेली सरकारे महत्वाची भूमिका बजावणार आहेत. शरद पवार हे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील, तर निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक मतांचे गणित जुळून येऊ शकते. राष्ट्रपती निवडणुकीसाठी अजून दोन वर्षे अवकाश आहे. त्यामुळे आतापासूनच संजय राऊत यांची मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठी संजय राऊत बिगर भाजपची सत्ता असलेल्या राज्यातील मुख्यमंत्र्यांची आणि तिथल्या नेतृत्वांची भेट घेणार आहेत. 

यामध्ये प्रामुख्याने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, केरळचे मुख्यमंत्री पी विजयन इत्यादी सर्वांना भेटून संजय राऊत हे शरद पवारांना राष्ट्रपती बनवण्याबाबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान केल्यानंतर, आता देशाच्या सर्वात मुख्य पदावर शरद पवार यांना बसवणे हे संजय राऊत यांचे पुढील मिशन असल्याची चर्चा आहे. त्यांचे हे मिशन येत्या काळात कशारितीने यशस्वी होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: अरविंद केजरीवाल अशोक गेहलोत कमलनाथ जगमोहन रेड्डी ममता बॅनर्जी मिशन राष्ट्रपती राष्ट्रपती राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार शिवसेना संजय राऊत