Categories: Featured

मंत्रीपदी सतेज की पीएन? कोल्हापूरात राजकीय चर्चा जोरात

कोल्हापूर।२३ डिसेंबर। राज्य मंत्रीमंडळाचा उद्या (२४) विस्तार होण्याची शक्यता असून कोल्हापूर जिल्ह्यातून मंत्रीपदासाठी जोरदार लॉबिंग सुरू असल्याचे दिसत आहे. प्रामुख्याने काँग्रेस नेत्यांमध्ये मंत्रीपदासाठी हे लॉबिंग सुरू आहे. आमदार सतेज पाटील आणि आमदार पी एन पाटील या दोघांमध्ये ही रस्सीखेच सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.  

सध्या कोल्हापूर जिल्हा काँग्रेसला पुन्हा चांगले दिवस आणण्यात सतेज पाटील यांचा महत्वाचा वाटा आहे. जिल्ह्यातून हद्दपार होत असलेल्या काँग्रेसला सतेज पाटील यांनी नवसंजिवनी दिल्याचे कुणीही नाकारू शकत नाही. विधानसभेच्या तोंडावर तत्कालीन कॉंग्रेस जिल्हा अध्यक्षांनी राजीनामा देऊन अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. या अडचणीच्या काळात जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सांभाळत सतेज पाटील यांनी जिल्ह्यात कॉंग्रेसचे वर्चस्व पुन्हा एकदा निर्माण केले. 

विधानपरिषदेवर आमदार असणाऱ्यांना मंत्रीपद द्यायचे नाही असे मत कॉंग्रेसच्या वर्तुळात चर्चिले जात असून त्यामुळे सतेज पाटील यांचे नाव मंत्रीपदाच्या यादीतून मागे पडते की काय अशी भिती सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांना वाटू लागलीय. त्यामुळे मंत्रीपदाच्या यादीत सतेज पाटील यांच्या ऐवजी पी.एन.पाटील यांच्या नावावर कॉंग्रेसच्या वरिष्ठ मंडळींकडून विचार विनिमय सुरू असल्याचेही बोलले जात आहे. 

तर, पी.एन.पाटील यांनी सतेज पाटील यांची विधानपरिषदेच्या आमदारकीची कमकुवत बाजू लक्षात घेऊन पक्षनिष्ठेच्या जोरावर दिल्ली दरबारी तसेच हायकंमाडकडे जोरदार फिल्डींग लावल्याची चर्चा आहे. पी.एन.पाटील यांनी दोन वेळा पराभूत होऊन पुन्हा नव्याने उभारी घेत तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने विजय खेचून आणला आहे. तसेच त्यांचे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, देशमुख घराणे यांच्याबरोबरच गांधी घराण्यांशी संबंधित व्यक्तींबरोबर असणाऱ्या सलोख्याच्या बळावर मंत्रीपदासाठी लॉबिंग सुरू आहे.

सध्या सतेज पाटील यांना माननाऱ्या कार्यकर्त्यांनी त्यांनाच मंत्री पद देण्यात यावे यासाठी सोशल मिडीयावर कॅंपेन सुरू केले असून वरिष्ठांनी यांची दखल घ्यावी अशी विनंती केली आहे. 

काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांनी खालील मुद्दे लक्षात घेऊन बंटी साहेबांना मंत्रीपद द्यावे.
  • १) भाजपमुक्त कोल्हापूर करण्यासाठी बंटी साहेबांनी केलेलं काम.
  • २) जिल्ह्यामध्ये एकही काँग्रेसचा विधानसभा  आमदार नसताना ह्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे चार आमदार निवडून आणले.
  • ३) राज्यातील अनेक दिग्गज नेते काँग्रेस पक्ष सोडून जात होते, तरीही राजकारण सोडेन पण पक्ष सोडणार नाही ही ठाम भुमिका.
  • ४) काँग्रेस पक्षाच्या पडत्या काळात सुद्धा काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष पद घेऊन पक्षाला नवसंजीवनी दिली.
  • ५) आज कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात काँग्रेस वाढवण्याचे काम बंटी साहेबांनी निष्ठेने केले आहे.
  • ६) गाव पातळीपासून ते जिल्हा पातळीपर्यंत प्रत्येक निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा उमेदवार कसा विजयी होईल यासाठी सदैव तत्पर असतात.
  • ७) कोल्हापूर मध्ये पक्ष म्हटलं की बंटी साहेब व बंटी साहेब म्हटलं तर काँग्रेस हे चित्र आता संपूर्ण जिल्ह्यात आहे.
  • ८) ज्या वेळी काँग्रेस पक्ष विरोधी पक्षामध्ये होता, त्यावेळी कोल्हापूर मध्ये मोठमोठे मोर्चे काढून तत्कालीन भाजप सरकारला जाब विचारणारे बंटी साहेब.

या रस्सीखेच मध्ये कोण जास्ती ताकदवर ठरणार आणि मंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे मात्र पहावं लागणार आहे.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: Congress NCP Shivsena कोल्हापूर कॉंग्रेस पीएनपाटील मंत्रीपद सतेज पाटील