Categories: राजकीय

कोल्हापूर कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष पदी आमदार सतेज पाटील यांची निवड

कोल्हापूर।७ सप्टेंबर। कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदी अखेर आमदार सतेज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे पत्र नुकतेच प्राप्त झाले असून यामुळे जिल्ह्यातील मरगळलेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. 

गेले दोन दिवस सतेज पाटील यांची कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष पदी वर्णी लागणार असल्याची जिल्हाभर चर्चा होती. तशा पोस्ट देखील व्हायरल केल्या जात होत्या. ऐनवेळी माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने ही जागा रिकामी झाली होती. 

दरम्यान आज (७ सप्टेंबर) सतेज पाटील यांच्या निवडीवर महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसने शिक्कामोर्तब केले असून तसे पत्रही देण्यात आले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर आवाडेंनी राजीनामा दिल्याने जिल्ह्यात कॉंग्रेसची नाचक्की झाली होती. त्यातच कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी कुणीही इच्छूक नसल्याने राज्याचे नेतृत्व देखील विचारात पडले होते. अखेर त्यांनी सतेज पाटील यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले आहे. 

जिल्ह्यातील कॉंग्रेस गटागटात विभागली असून यासर्वांना एकत्र घेऊन वाटचाल करण्याचे आव्हान यापुढे सतेज पाटील यांच्यासमोर असणार आहे. 

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: kolhapur satej patil