Categories: Featured

अखेर पुण्यातील ‘सविता भाभी’चं गूढ उकललं…

पुणे। पुण्यात सूचक शब्दात लागणारे होर्डिंग अनेकदा लोकांना गोंधळात टाकत असल्याचे आजवर दिसून आलय. अशाच एका पोस्टरने गेले दोन दिवस पुणेकरांना गोंधळात टाकलं होतं. गल्लोगल्लीत, रस्त्या रस्त्यावर आणि चौकाचौकात लागलेल्या या होर्डिंगनं पुणेकर पुरते गोंधळून गेले होते. सगळीकडंच ‘सविता भाभी… तू इथंच थांब!!!’ असं लिहिलेल्या होर्डिंग्जची जोरात चर्चा सुरू होत्या. या होर्डिंगवर बाकी काहीही लिहिलेलं नसल्यानं हे होर्डिंग्ज सध्या चर्चेचा विषय ठरले होते. गोंधळलेल्या पुणेकरांना आता याचं उत्तर मिळालं असून हा सर्व खटाटोप चित्रपटाच्या प्रमोशनसाठी असल्याचं समोर आलं आहे. 

अश्लील शब्द उच्चारला तरी अनेकांच्या नजरा आपल्याकडं वळतात. परंतू आता ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ या नावाचा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळं सोशल मीडियावर या चित्रपटाच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. या चित्रपटात अभिनेत्री पर्ण पेठे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर बोल्ड अभिनेत्री सई ताम्हणकर देखील या चित्रपटात दिसणार आहे. 

अभिनेता आलोक राजवाडे हा ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असून तसंच या चित्रपटाच्या निमित्तानं तो दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. या चित्रपटाचं पोस्टर नुकतच सोशल मीडियावर शेअर करण्यात आलं. चित्रपटाचे पोस्टर पाहता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. लवकरच या चित्रपटाचा टीझर प्रेक्षणांच्या भेटीला येणार आहे. 

या चित्रपटात सायली पाठक, अक्षय टांकसाळे, ऋतुराज शिंदे, केतन विसाळ, विराट मडके हे कलाकार देखील झळकणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती गौरी आणि बनी डालमिया, सुरेश देशमाने, विनोद सातव यांनी केली आहे. हा चित्रपट ६ मार्च २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Lokshahi News