Categories: Featured अर्थ/उद्योग

SBI: EMI पुढे ढकलण्यासाठी OTP शेअर करू नका, फसवणूक टाळण्यासाठी ‘ही’ लिंक ओपन करून ‘EMI’ पुढे ढकला

मुंबई। देशातील लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे सायबर क्राईमचे प्रमाण देखील वाढण्याची शक्यता ध्यानात घेऊन देशातील आघाडीची बॅंक असलेल्या SBI ने आपल्या ग्राहकांसाठी महत्वाची सूचना जारी केली आहे. यामध्ये बॅंकेने आपल्या ग्राहकांना नवीन प्रकारच्या सायबर क्राईम बद्दल इशारा दिला आहे. या नवीन सायबर क्राईमबाबत सांगताना बॅंकेने म्हणटले आहे की, सध्या ‘ईएमआय’ टाळण्यासाठी ग्राहकांकडून ‘ओटीपी’ मागितले जात असल्याच्या घटना घडत आहेत. परंतु आपला ओटीपी अशाप्रकारे कुणालाही सामायिक करण्याची गरज नाही. अन्यथा आपली फसवणूक होऊ शकते. ईएमआय टाळण्याच्या योजनेबद्दल जर माहिती हवी असल्यास ग्राहकांनी बॅंकेच्या अधिकृत वेबसाईटलाच भेट द्या. https://bank.sbi/stopemi स्टेट बॅंकेने यासंदर्भात ट्विट करून ग्राहकांना हा माहितीवजा इशारा दिला आहे. 

देशातील लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे सायबर क्राईम करणारे वेगवेगळ्या पध्दतीने फसवणूक करण्याचे मार्ग शोधत आहेत. या लोकांपासून आपली फसवणूक टाळण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे ग्राहकांनी सतर्क राहणे हेच आहे. जर ग्राहकांनी आपला ओटीपी शेअर केला तर खात्यातील रक्कम काही क्षणातच लंपास केली जाते. 

रिझर्व्ह बॅंकेने सध्या ओढवलेल्या परिस्थितीमुळे कर्जदारांची आर्थिक स्थिती स्थिर ठेवण्यासाठी वैयक्तिक आणि व्यावसायिक कर्जदारांसाठी ईएमआय पुढे ढकलण्यासाठी ऑफर दिली आहे. ज्यायोगे ग्राहक तीन महिन्यांसाठीचा ईएमआय पुढे ढकलू शकतात. याचपार्श्वभूमीवर एसबीआयने आपल्या ग्राहकांना रिझर्व्ह बॅंकेच्या ऑफरनुसार ईएमआय पुढे ढकलण्यासाठी ई-मेलव्दारे बॅंकेत अर्ज सादर करण्यास सांगितले आहे. या कालावधीत ईएमआय पुढे ढकलला जाईल, मात्र मूळ रक्कमेवर व्याज आकारले जाणार आहे. ज्यांना ईएमआय पुढे ढकलण्याची इच्छा नाही अशा ग्राहकांनी काहीही करण्याची गरज नसल्याचेही बॅंकेने स्पष्ट केले आहे. 

Rajendra Hankare