नवी दिल्ली | देशातील सर्वात मोठी बॅंक अर्थात स्टेट बॅंक ऑफ इंडियाची ऑनलाईन बॅंकिंग सेवा ठप्प झाली आहे. बॅंकेने यासंदर्भात ट्विटकरून माहिती दिली आहे. यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सध्या बॅंकेचे ऑनलाईन व्यवहार ठप्प असून फक्त एटीएम आणि पॉस मशिन सुरू आहेत. निर्माण झालेला अडथळा दूर करण्यासाठी दुरूस्तीचं काम तात्काळ हाती घेण्यात आलं असून ग्राहकांनी सहकार्य करावं अशी विनंती बॅंकेच्यावतीने करण्यात आली आहे.
बॅंकेने दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाईन सेवा बंद असल्याकारणाने ग्राहक कुणालाही मोबाईल अॅप किंवा मनी ट्रान्सफरिंग अॅपव्दारे पैसे पाठवू शकत नाहीत. परंतु सध्या ग्राहकांसाठी एटीएम सेवा सुरू आहे. दुपारपर्यंत सर्व सेवा सूरु करण्याची ग्वाही बॅंकेने दिली असली तरी अद्याप ही सेवा सुरू झालेली नाही. एसबीआय च्या योनो अॅपव्दारे ग्राहकांना खाते वापरता येत नाही. त्यामुळे सोशल मिडीयावर याबद्दल अनेक ग्राहकांनी आपला संतापही व्यक्त केला आहे. तर काहींनी ऑनलाईन सेवा बंद होणार होती तर तसे मेसेज प्रत्येक ग्राहकाला पाठवणे गरजेचे होते असेही काही ग्राहकांना बॅंकेला सल्ले देताना म्हणटले आहे.
सध्या SBI जगभरातील ३० पेक्षा अधिक देशांमध्ये सेवा देते. या बॅंकेचे तब्बल ६.६ कोटी पेक्षा अधिक ग्राहक बॅंकेची ऑनलाईन सेवा वापरतात. त्यामुळे कोणत्याबी प्रकारची पूर्वकल्पना न देता सेवा ठप्प होणं गंभीर असल्याची तक्रार काही ग्राहकांनी बॅंकेच्या बाबतीत केली आहे.