नवी दिल्ली | देशभरातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी असून गेले अनेक दिवस शाळा कधी सुरू होणार याची उत्सुकता आता संपुष्टात आली आहे. केंद्रीय शिक्षण मंडळाने देशातील विविध राज्यांना १५ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्यासंदर्भात गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. त्यामुळे देशभरात टप्प्याटप्प्याने शाळा सुरू होणार आहेत. सुरवातीला मोठ्या वर्गाच्या आणि त्यानंतर लहान वर्गाच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात गाईडलाईन्स देण्यात आल्या आहेत.
शाळा सुरू करण्याबाबतची मानक कार्यप्रणाली राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी ठरवायची आहे. सोशल डिस्टन्सिंग, शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची काळजी, आरोग्यची काळजी ही जबाबदारी शाळांवर राहणार आहे. तसेच जो माध्यन्ह आहार दिला जाणार आहे तो स्वच्छ, सुरक्षित असेल याचीही जबाबदारी संबंधित शाळा आणि राज्य सरकारची असणार आहे.
एकीकडे १५ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्यासंदर्भात गाईडलाईन्स देण्यात आल्या असल्या तरी पालकांची लेखी संमती असेल तरच विद्यार्थी शाळेत येऊ शकणार आहेत. विद्यार्थ्यांना रोज हजर राहण्याचे बंधन असणार नाही. हजर राहण्याबाबत विद्यार्थ्यांना मुभा देण्यात आली आहे. तसेच शाळेत हजर राहण्याऐवजी ऑनलाईन शिक्षण पध्दतीचा अवलंब करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.