Categories: राजकीय

शिवसेनेने एबी फॉर्म वाटून परस्पर वाढवून घेतल्या दोन जागा, भाजपची डोकेदुखी वाढल्याने युतीबाबत प्रश्नचिन्ह?

मुंबई।३० सप्टेंबर। विधानसभा निवडणूकीचा बिगुल वाजल्याने सगळेच राजकिय पक्ष निवडणूकीच्या तयारीला लागले आहेत. अनेकानी आपले उमेदवारही जाहीर केले आहेत. शिवसेना भाजप युतीचे मात्र अद्याप भिजत घोंगडे असल्याने भाजप सेनेचे उमेदवार घोषीत होऊ शकले नव्हते. मात्र आज घटस्थापनेचा मुहूर्त साधत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी १४ उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करून दबावतंत्राचा वापर केल्याचे पहायला मिळाले.

गेले काही दिवस युतीच्या जागावाटपावरून भाजप शिवसेनेत तानातानी सुरू आहे. शिवसेना नरमाईची भुमिका घेत नसल्याने युती करायची की नाही या विचारात भाजपचे नेते आहेत. तर कोणत्याही परिस्थितीत यापेक्षा कमी जागा लढवायच्या नाहीत अशा मनस्थितीत शिवसेना आहे. त्यामुळे युती झाली नाहीतरी दोन्ही पक्षांची सर्व जागा लढवण्यासाठीची उमेदवार यादी तयार असल्याचे सांगितले जात आहे. 

त्यातूनच दिल्लीतील भाजपच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदार संघातून संजय शिरसाट, कोल्हापूर उत्तरमधून राजेश क्षीरसागर, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून पुन्हा विद्यमान आमदार तथा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना एबी फॉर्मचे वाटप केले आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील सहा विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. करवीरमधून आमदार चंद्रदीप नरके, हातकणंगलेमधून डॉ. सुजित मिणचेकर, शाहुवाडी सत्यजीत पाटील, राधानगरीतून प्रकाश आबिटकर, शिरुळमधून उल्हास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर कागलमधून संजयबाबा घाटगे आणि चंदगडवरुन संग्राम कुपेकर यांच्यासाठी परस्पर जागा निर्माण केली आहे. 

शिवसेनेच्या या खेळीने भाजपची डोकेदुखील वाढवली असून सेनेच्या या कृतीमुळे युती होणार नसल्याचा संदेश संपूर्ण राज्यात गेल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकमेकांविरोधात घोषणा देण्यासाठी तयार राहावे लागणार असल्याचे चित्र सध्यातरी निर्माण झाले आहे. 

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: sena bjp vidhansabha 2019