Categories: राजकीय

शिवसेना नेत्याची गोळ्या झाडून हत्या; बचाव करताना पत्नी व मुलगी जखमी

नवी दिल्ली | सुशांतसिंह आत्महत्येवरून संपूर्ण देशभरात चर्चांना उधाण आलेलं असताना मध्य प्रदेशातील शिवसेना नेते व माजी प्रदेशप्रमुख रमेश साहू यांची गोळी घालून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या गोळीबारात साहू यांची पत्नी आणि मुलगी जखमी झाले आहेत. मध्यप्रदेश राज्यातील इंदूर जवळील उमरी खेडा याठिकाणी घटना घडली आहे. मंगळवारी रात्री उशिरा घडलेल्या या घटनेनंतर आरोपी फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

तेजाजी नगर पोलिस स्टेशनचे प्रभारी आरएनएस भदोरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे माजी मध्यप्रदेश प्रमुख रमेश साहू हे इंदूर-खंडवा रोडवरील उमदीखेडा गावात ढाबा चालवत. मात्र, घटना स्थळावरून कसल्याही प्रकारच्या वस्तूंची अथवा पैशांची चोरी झालेली नाही. यामुळे जुन्या भांडणातून ही घटना घडली असावी, अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. रमेश साहू यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. याच ढाब्यावर मंगळवारी रात्री उशीरा अज्ञात इसमाने त्यांच्या छातीवर गोळी झाडून ठार मारले. हत्येमागील कारण अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे असेही भदोरिया यांनी सांगितले.

साहू हे गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेत सक्रिय नव्हते. ९० च्या दशकात साहू हे शिवसेनेचे प्रदेशाध्यक्ष होते आणि त्यावेळी त्यांनी अनेक आंदोलनात नेतृत्व केले होते. या हत्येमुळे मध्यप्रदेश मधील वातावरण ढवळून निघण्याची चिन्हे असल्याचे मत काही राजकीय जाणकारांनी व्यक्त केलं आहे.

Team Lokshahi News