Categories: राजकीय

राजीनामा शिवसेना खासदाराचा; तोडफोड राष्ट्रवादीच्या कार्यालयाची..!

परभणी | शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी राजीनामा दिल्यानंतर अज्ञातांनी परभणी येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा कार्यालय फोडल्याची घटना घडली आहे. स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून गळचेपी होत असल्याचे कारण देत जाधव यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. राष्ट्रवादीच्या कार्यालयावर झालेल्या दगडफेकीत कार्यालयाचे मोठे नुकसान झाले आहे. राष्ट्रवादीचे कार्यालय हे वसमत रोडवर आहे. रात्री १० च्या सुमारास ही दगडफेक झाली असल्याचे बोलले जात आहे. दगडफेकीत कार्यालया समोरच्या काचा फुटल्या असून, मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान परभणी जिल्ह्यात दुपारपासूनच राजकारणात मोठ्या घडामोडी घडत होत्या.

शिवसैनिकांनी काचा फोडल्याची चर्चा?

शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी राष्ट्रवादीला जिल्ह्यात झुकते माप मिळत आहे. राष्ट्रवादीमुळे शिवसैनिकांवर अन्याय होत आहे, असा आरोप करत खासदारकीचा राजीनामा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला होता. त्यानंतरच राष्ट्रवादीच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे या घटनेमागे शिवसैनिकांचा हात आहे? अशी चर्चा सुरु आहे. काही तरुणांनी दुचाकीवरून येऊन दगडफेक केली असल्याची माहिती आहे.

शिवसेनेचं प्रशासक मंडळ नियुक्त न झाल्याने खासदार नाराज

जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रवादीचे अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले आहे. दरम्यान बाजार समितीत शिवसेनेचे अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी प्रचंड प्रयत्न केले. मात्र त्यांच्या प्रयत्नाला यश आले नाही. यामुळे शिवसैनिकांवर अन्याय झाल्याची भावना खासदार जाधव यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान जाधव यांनी मुख्यमंत्र्यांसोबत बोलूनही शिवसेनेचं प्रशासक मंडळ नियुक्त न झाल्याने खासदार जाधव यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

राजीनाम्यात काय लिहिलं जाधव यांनी –
दरम्यानच्या काळात जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर यावेळेस तरी शिवसेनेचे प्रशासक मंडळ नियुक्त करावे, म्हणून आपल्याकडे सतत पाठपुरावा करीत राहिलो. मात्र याही वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रशासक मंडळ नियुक्त केले. ही बाब माझ्या मनाला फारच खटकली असून कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले आहेत. आपले सरकार असताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना जर मी न्याय देऊ शकत नसेल तर खासदार पदावर राहण्याचा माझा मुळीच नैतिक अधिकार नाही, तेव्हा पूर्ण विचारांती आणि राजखुशीने मी खासदार पदाचा राजीनामा आपल्याकडे देत आहे. मी शिवसैनिक म्हणून काम करेन. तरी माझा खासदारकीचा राजीनामा मंजूर करावा ही विनंती.

Team Lokshahi News