Categories: राजकीय

शपथविधीसाठी शरद पवारांचा आमदारांना फोन, मंत्रीमंडळ विस्ताराच्या हालचाली गतीमान

मुंबई।२९ डिसेंबर। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः मंत्रिपदासाठी निवडलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांना फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. फोनकरून शरद पवारांनी संबंधित आमदारांना सोमवारी शपथविधीस हजर राहण्यास सांगितलं आहे. अजित पवार, प्रफुल्ल पटेल हे शरद पवार यांच्या सिल्वर ओक बंगल्यावर दाखल झालेत. त्यांनी शरद पवार यांच्याशी राज्य मंत्रिमंडळ विस्तार आणि राष्ट्रवादी मंत्रीपदाची यादी यावर चर्चा केल्याची माहिती सध्या मिळत आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपल्या मंत्रीपदाची यादी निश्चित केली असून या यादीत घटक पक्षातील काही नेत्यांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. तर शिवसेनेने मात्र अद्याप कुणाही आमदाराला मंत्रीपदाच्या शपथविधीसाठी फोन केलेला नसल्याचे समजते. रात्री उशिरा शिवसेनेकडून संभाव्य मंत्र्यांना फोन केले जातील असे सांगण्यात येत आहे. 

दरम्यान कॉंग्रेसमध्ये मंत्रीपदासाठी इच्छूकांची संख्या अधिक होऊ लागल्याने नाराजांच्या संख्येत भर पडत असल्याचे समजते. सुरवातीपासून यंगब्रिगेडला मंत्रीमंडळात स्थान देण्याबाबतीत ठाम असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेस हायकमांड प्रदेशाध्यपदाची धुरा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य मंत्रीमंडळात पृथ्वीराज चव्हाण यांच्याऐवजी अशोक चव्हाण यांना हायकंमाडकडून संधी मिळणार आहे.

Team Lokshahi News