Categories: कृषी बातम्या सामाजिक

शरद पवारांनी ऐकल्या मराठवाड्यातील बळीराज्याच्या व्यथा..!

उस्मानाबाद | राज्यातील अतिवृष्टीने निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार मराठवाडा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी पवार यांनी शेतकऱ्यांशी मुक्तपणे संवाद साधला. तुळजापूरातून त्यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. यानंतर काकांब्रा, लोहारा, सास्तुरा या गावांचा दौरा करत शरद पवार मार्गक्रमण करत आहेत. 

नुकसानग्रस्त गावांना भेटी देताना शरद पवार यांनी रस्त्यात अनेक ठिकाणी गाडी थांबवून शेतकऱ्यांची विचारपूस केली. यावेळी लोहारातील शेतकऱ्यांनी शरद पवार यांच्यापुढे आपली व्यथा मांडली. पावसाने शेतातील पीके जमीनदोस्त झाली आहेत, तर ज्यांच्या कापण्या झाल्या होत्या ती वाहून गेली आहेत. हे नुकसान शेतकऱ्यांनी शरद पवार यांना दाखवले. यावेळी शेतकऱ्यांनी पवार यांना, आम्ही दुबार पेरणी केली, पण पावसामुळे ती वाया गेली. त्यामुळे आता किमान पुढील पेरणीआधी पंचनामे होऊन आम्हाला आर्थिक मदत द्या, असे सांगितले. यावर शरद पवार यांनी पंचनाम्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना तुमच्या झालेल्या नुकसानीची नीट माहिती द्या, असे शेतकऱ्यांना सांगितले.

या अतिवृष्टीने मराठवाड्यातील उमरगा आणि लोहारा या तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. गेल्या १० ते १२ वर्षात पहिल्यांदाच इतका पाऊस झाल्याचे इथल्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या जोरदार पावसाने शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून शरद पवार प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत आहे. शेतकऱ्यांशी मुक्त संवाद साधून प्रत्येक शेतकऱ्याची व्यथा ते व्यवस्थित समजून घेऊन अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचनाही देत आहेत. सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. या दोन्ही नेत्यांच्या सूचनांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी लवकरच मोठा निर्णय घेतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. दरम्यान मुख्यमंत्री ठाकरे देखील सोमवारी सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: sharad pawar visit to marathwada