Categories: कृषी

कांदा निर्यातंबदीवरून शरद पवारांचे केंद्र सरकारला खडे बोल; म्हणाले व्यापाऱ्यांना मोठं न करता ‘हा’ निर्णय घ्या..!

नवी दिल्ली |  केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीच्या घेतलेल्या निर्णयाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार चांगलेच संतापले आहेत. कांदा निर्यातबंदीच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी पवारांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट घेत निर्यात बंदीच्या निर्णयाला विरोध केला आहे. तसेच कांदा निर्यातीबाबत निर्णय घेताना व्यापाऱ्यांना मोठं न करता शेतकरी हिताचा निर्णय घ्या, असं खडे बोलही केंद्राला सुनावले आहेत. पियुष गोयल यांच्या भेटीची माहिती शरद पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे.  

शरद पवार यांनी पियुष गोयल यांना शेतकऱ्यांची स्थिती आणि या निर्णयाचे दुष्परिणाम यावरही माहिती दिली. ग्राहक संरक्षण आणि अन्न पुरवठा मंत्रालयाने कांदा निर्यात बंदी करण्याचा प्रस्ताव दिला. याच आधारावर केंद्र सरकारने निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे. यानंतर देशभरातून या निर्णयाला विरोध होत आहे. यावर शरद पवार म्हणाले, “मोठ्या प्रमाणात शेतकरी अल्पभूधारक आहे. “केंद्र सरकारने आकस्मिकपणे कांद्याची निर्यातबंदी जाहीर केली. त्यावर महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक बेल्टमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली व विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी माझ्याशी काल रात्री संपर्क करून केंद्र सरकारला या प्रतिक्रियेबाबत अवगत करण्याची विनंती केली. 

या विनंतीला अनुसरुन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं की, हा कांदा निर्यातबंदीचा प्रस्ताव केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयातर्फे बाजारातील कांद्याच्या वाढत्या किमतींच्या आधारावर आला आहे.” यासंदर्भात केंद्रीय वाणिज्य मंत्रालय, अर्थ मंत्रालय आणि ग्राहक संरक्षण मंत्रालय या तिन्ही मंत्रालयांशी चर्चा करून आम्ही या निर्यातबंदीचा फेरविचार करू व जर एकमत झाल्यास याबाबतीत पुनर्निर्णय घेऊन असं गोयल यांनी स्पष्ट केल्याचंही शरद पवार यांनी सांगितलं आहे. 

Team Lokshahi News