Categories: राजकीय

राज ठाकरेंना गांभिर्याने घेण्याची गरज नाही – शरद पवार

पुणे। राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली असून राज ठाकरे यांना गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचा टोला हाणलाय. दिल्ली विधानसभा निवडणुक निकालाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी राज ठाकरेंवर टीका केलीय. 

यावेळी शरद पवार म्हणाले की, “काही लोक राज ठाकरे यांचं भाषण ऐकायला येतात. तर काही राज ठाकरेंना पाहायला येतात. त्यामुळे राज ठाकरे यांच्या भाषणाला गर्दी होते”. बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात राज ठाकरे यांनी ९ फेब्रुवारीला मुंबईत मोर्चा काढला होता. या मोर्चात नाशिक, पुणे आणि राज्यभरातील मनसैनिक सहभागी झाले होते. मोर्चानंतर आझाद मैदान येथे राज ठाकरेंची सभा झाली होती. या सभेलाही प्रचंड गर्दी दिसली होती. मात्र, यावरुन शरद पवार यांनी मनसेवर निशाणा साधला आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यात चांगले संबंध असल्याचे निदर्शणास आले होते. राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीवेळी ‘लाव रे तो व्हिडीओ…’ म्हणत राज्यभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात प्रचार केला होता. त्यांच्या या प्रचाराचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी समर्थन केलं होते. परंतु विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यावर मनसेने भाजपशी जवळीक साधल्याचं दिसू लागलय. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवारानी राज ठाकरेंवर टीका केल्याने पवारांच्या या टीकेला मनसेकडून काय उत्तर येतंय, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: Sharad pawar slams Raj Thackeray