Categories: राजकीय सामाजिक

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ कार्यक्रमात सरपंच शितल फराकटे यांनी राज्यसरकारकडे केल्या ‘या’ महत्वाच्या मागण्या

कागल | कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी या महत्वकांक्षी अभियानाच्या ऑनलाईन शुभारंभ कार्यक्रमात फराकटेवाडी येथील सरपंच शीतल रोहित फराकटे या सहभागी झाल्या. फराकटे यांनी या कार्यक्रमात पुणे विभागाचे प्रतिनिधित्व केले. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी सौ. फराकटे यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांची नोंद घेतली. कार्यक्रमात फराकटे यांनी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य मंत्री राजेश टोपे आदी मान्यवरांशी संवाद साधला.

यावेळी फराकटे यांनी राज्य सरकारकडे, कोल्हापूर जिल्ह्यासाठी ऑक्सिजनसह वेंटिलेटर बेड वाढवण्याची मागणी केली. जे जे कोरोना बाधित होतील, त्या सगळ्यांचा समावेश महात्मा फुले जन आरोग्य योजनेत करून त्यांच्यावरील उपचार मोफत व्हावेत, गावचा कुटुंब प्रमुख म्हणून कोरोनाशी दोन हात करताना जे सरपंच, अगर ग्रामपंचायत पदाधिकारी मृत झाले, अशा कोरोना योद्ध्यांच्या वारसाना ५० लाखाचे विमासुरक्षा कवच लागू करण्याची मागणी केली. याबरोबरच महाराष्ट्रातील १४ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींवर प्रशासक असले तरी तिथल्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी व सामाजीक संस्थांनी पालकत्वाची भूमिका घेऊन हे अभियान यशस्वी करूया असे म्हणत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या महत्वकांक्षी अभियानातून कोरोनासारख्या जागतिक महामारीवर मात करण्याचा आत्मविश्वासही व्यक्त केला.

यावेळी, फराकटे यांनी १३ वा वित्त आयोगाचा अखर्चित निधी व १४ वित्त आयोगाच्या व्याजातून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांच्या खर्चासाठी निधी परवानगी दिल्याबद्दल सरकारचे आभार मानले. तसेच कोरोना योद्धे म्हणून लढणाऱ्या कोरोना योद्ध्यांचे आत्मबल वाढवण्यासाठी विमा सुरक्षा कवच लागू केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. 

Team Lokshahi News