Categories: Featured

खासदार धैर्यशील मानेंचा कर्नाटकातील नेत्याला ‘दम’

कधी आणि कुठे गोळ्या घालणार याची तारीख, वेळ सांगा – खा. धैर्यशील मानेंचे कर्नाटकातील नेत्याला थेट आव्हान

कोल्हापूर।२७ डिसेंबर। महाराष्ट्र एकीकरण समितीमधील एकाही कार्यकर्त्याच्या केसाला जरी धक्का लागला, तरी गाठ शिवसेनेशी आहे, असा सज्जड दम हातकणंगलेचे शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी दिला आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती विरोधात कर्नाटक नवनिर्माण सेनेचे स्वयंघोषित अध्यक्ष भीमाशंकर पाटील यानी बेताल वक्तव्य केले होते. त्या विरोधात माने यांनी हा पवित्रा घेतलाय.

‘गेल्या ६४ वर्षांपासून महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी कायदेशीररित्या आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समिती विरोधात बेजबाबदार, बेताल वक्तव्य करणाऱ्या भीमाशंकर पाटील यांना मी सांगू इच्छितो “कधी आणि कुठे गोळ्या घालणार आहात याची तारीख आणि वेळ सांगा, पाहूया तुमच्या गोळ्या कमी पडतात की आमची माणसं, याचे उदाहरण घालून देऊ” असा इशारा धैर्यशील माने यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिला आहे.

‘आजवर महाराष्ट्राच्या एकीकरणासाठी अनेकांनी हौतात्म्य पत्करलेले आहे. भीमाशंकर पाटील यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी तसे सांगावे, आजही महाराष्ट्राच्या एकीकरणासाठी निधड्या छातीने गोळ्या झेलायला लाखो लोक उभे राहतील, पण कर्नाटकातील वंचितांना महाराष्ट्रात आणण्यास आम्ही कटिबद्ध आहोत हे ध्यानात ठेवावे.’ असंही धैर्यशील माने यांनी बजावलं.

भीमाशंकर पाटील काय म्हणाले?

गेली अनेक वर्षे सीमावासिंयासाठीचा लढा सुरू ठेवणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना महाराष्ट्र – कर्नाटक सीमेवर उभे करुन गोळ्या घाला, असं वादग्रस्त वक्तव्य कर्नाटक नवनिर्माण सेनेचा स्वयंघोषित अध्यक्ष भीमाशंकर पाटील यानी केलं होतं. त्यावर खासदार धैर्यशील माने यांनी आक्रमक पवित्रा घेत हा इशारा दिलाय. 

Team Lokshahi News