परभणी | राष्ट्रवादीकडून गळचेपी होत असल्याचा आरोप करत शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकार मध्ये खळबळ उडाली असून राजकीय चर्चाना उधाण आलं आहे. संजय जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्या खासदारकीचा राजीनामा पाठवला आहे. त्यांनी राजीनाम्यासोबतच एक पत्रदेखील पाठवलं आहे. परभणीत स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये मतभेद आहेत. राष्ट्रवादीकडून गळचेपी होत असल्याचा आरोप करत संजय जाधव यांनी पत्रात व्यथा मांडल्या आहेत.
जाधव यांनी काल संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून आपण खासदारकीचा राजीनामा देत असल्याचं स्पष्ट केलं आहे. या राजीनाम्यामागे त्यांनी राष्ट्रवादीचं स्थानिक राजकारण कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे. परभणीच्या जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील राजकारण यामागे आहे. मागच्यावेळी राष्ट्रवादीचं प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्यात आलं होतं. जिंतूरमध्ये राष्ट्रवादीचा आमदार नसतानाही प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्यात आलं होतं. त्यामुळे शिवसैनिक नाराज झाले होते. त्यावेळी पुढच्यावेळी आपल्याला संधी मिळेल असं सांगून आपण शिवसैनिकांना समजावलं. परंतु, आता पुन्हा जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादीचंच प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्यात आलं आहे. राष्ट्रवादीच्या स्थानिक राजकारणामुळे शिवसेनेची गळचेपी होत असून त्यामुळे आपण आपल्या खासदारकीचा राजीनामा देत आहे, असं जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे