Categories: राजकीय

शिवसेनेनं मंत्रिपदाचा दर्जा दिलेल्या दोघांचेही घेतले राजीनामे?

मुंबईशिवसेनेनं मंत्रिपदाचा दर्जा दिलेल्या दोन आमदारांचे राजीनामे घेतल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. सेनेनं रवींद्र वायकर आणि अरविंद सावंत यांचे राजीनामे घेतल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे भाजपकडून आक्षेप घेण्याची कुणकुण लागल्यानेचं शिवसेनेनं हा सावध पवित्रा घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

भाजपकडून ‘ऑफिस ऑफ प्रॉफिटनुसार’ आक्षेप घेण्याची तयारी केली होती. मात्र त्यापूर्वीच शिवसेनेनं दोन्ही मंत्र्यांचे राजीनामे घेऊन ठेवले आहेत. वायकर आणि सावंत यांच्याकडून मात्र अशा कुठल्याही घटनेचा इन्कार करण्यात आला आहे. वायकर यांची ११ फेब्रुवारीला मुख्यमंत्री सचिवालयात प्रमुख समन्वयक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर १४ फेब्रुवारीला अरविंद सावंत यांची महाराष्ट्र राज्य संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य शासनाने अध्यादेश काढून ही नियुक्ती केली आहे. अध्यादेशात रवींद्र वायकर आणि अरविंद सावंत यांना देण्यात येणारे वेतन, भत्ते आणि सुविधा यांचा उल्लेख वादाचे कारण बनलं आहे. “ऑफिस ऑफ प्रॉफिट” या नियमानुसार भाजपाकडून आक्षेप घेतला जाण्याची वा न्यायालयात धाव घेण्याची कुणकुण लागताच शिवसेनेनं हा पवित्रा घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

वायकर आणि सावंत यांनी अजून पदभार स्वीकारलेला नाही. पण त्यांच्या पदांवर आक्षेप घेत वाद निर्माण झाल्यास राजीनाम्याची नामुष्की ओढवण्याची स्थिती निर्माण झाली, तर सावध उपाययोजना म्हणून दोघांकडून बॅक डेटेड राजीनामे घेतले गेल्याची जोरदार चर्चा आहे. किंवा सुधारित अध्यादेश काढून यांना संबंधित पदांवर कायम ठेवता येईल का? याबाबतची चाचपणी सुरु आहे.

शिवसेनेतील नाराज नेत्यांचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शासकीय अध्यादेश काढून अरविंद सावंत आणि वायकरांची मंत्रिपदी नियुक्ती केली होती. मात्र, आता याच नियुक्त्या वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता असल्याने शिवसेनेनं हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. 

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: अरविंद सावंत महाविकास आघाडी सरकार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे रविंद्र वायकर शिवसेना