Categories: Featured

संतापजनक: नक्षलवादी हल्ल्यात १७ जवानांना वीरमरण, घटनेने देश हादरला

रायपूर (छत्तीसगड)।एकीकडे सारा देश कोरोना विषाणूशी लढण्यात गुंतला असताना नक्षली क्षेत्रात जवान नक्षलवाद्यांसी दोन हात करत आहेत. या लढाईत आज दुर्दैवी घटना घडली असून सीआरपीएफ-डीआरजी पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत १७ जवानांना वीरमरण आलं आहे. शनिवारी रात्री (२१ मार्च) सुकमा जिल्ह्यातील चिंतागुफा पोलीस स्टेशन अंर्तगत असणाऱ्या बुर्कापाल जंगलात सीआरपीएफने कोंबिंग ऑपरेशन सुरु केलं होत. यावेळी नक्षलवाद्यांनी कोंबिंग ऑपरेशन करणाऱ्या १५० जवानांवर अचानक हल्ला केला. यानंतर पोलिस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत ५ नक्षलवाद्यांचाही खात्मा करण्यात आला आहे. नक्षलवाद्यांशी लढताना १४ जवानही जखमी झाले आहेत.

दरम्यान, सीआरपीएफ आणि आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीनंतर सुरुवातीला १३ जवान बेपत्ता होते. मात्र, शोध मोहिमेत त्यांचे मृतदेह सापडले. पोलिस आणि नक्षलवादी यांच्यातील चकमकीच्या वेळी पोलिस दलाला नक्षलवाद्यांनी वेढल्यानंतर जिल्हा मुख्यालयाकडून मदत मागवण्यात आली. त्यानंतर काही वेळातच पोलिसांचं हेलिकॉप्टर घटनास्थळावर दाखल झालं. हेलिकॉप्टर बघताच नक्षलवादी जंगलात पसार झाले. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलिस जवानांवर रायपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दोन वर्षांपूर्वीदेखील सुकमा जिल्ह्यातील बुर्कापाल जंगल परिसरातच २०० पेक्षा अधिक नक्षलवाद्यांनी सीआरपीएफ पथकावर हल्ला केला होता. सीआरपीएफची एक तुकडी गस्त घालत असताना बुर्कापाल जंगलात दबा धरुन बसलेल्या नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात २५ जवान शहीद झाले होते. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता. तशीच घटना आज पुन्हा घडली असून या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. 

Team Lokshahi News