Categories: न्यायालय सामाजिक

आता श्रीकृष्ण जन्मभूमीचेही प्रकरण कोर्टात..

नवी दिल्ली | अयोध्येतील राम जन्मभूमीतील मंदिराचे निर्माण सुरळीतपणे सुरु झाले आहे. दरम्यान राम जन्मभूमीच्या वादानंतर आता कृष्ण जन्मभूमीचेही प्रकरण कोर्टात गेले आहे. श्रीकृष्ण विराजमानने मथुरेच्या न्यायालयात दिवाणी खटला दाखल करून १३.३७ एकर जमिनीचा (कृष्ण जन्मभूमी) मालकी हक्क मागितला आहे. यासोबतच परिसरातील शाही मशीद आणि ईदगाह हटवण्याची मागणी केली आहे. 

श्रीकृष्ण विराजमानच्या वतीने विष्णू शंकर यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकेत म्हणटल्याप्रमाणे, जेथे आज शाही मशीद व ईदगाह आहे, त्याच ठिकाणी श्रीकृष्णांचा जन्म झाला ते कारागृह आहे. तसेच यात १९६८ साली झालेला जमिनीचा करार चुकीचा असल्याचे म्हटले आहे. या खटल्यात त्यांच्या अंतरंग सखी म्हणून अधिवक्ता रंजना अग्निहोत्री आणि ६ भक्तांचा समावेश आहे.

काय आहे  १९६८ चा करार 
१९५१ मध्ये श्री कृष्ण मंदिराचे पुनर्निर्माण करण्यासाठी श्री कृष्ण जन्मभूमी ट्रस्टची पुनर्बांधणी करण्यात आली होती. यानंतर १९५८ मध्ये श्री कृष्ण जन्म स्थान सेवा संघ नावाची संस्था स्थापन झाली. संस्थेचा जमिनीवर कायदेशीररित्या मालकी हक्क नव्हता. परंतु ती संस्था ट्रस्टला सोपविलेल्या सर्व भूमिका बजावू लागली. या संस्थेने संपूर्ण जमीन ताब्यात घेण्यासाठी १९६४ मध्ये दिवाणी खटला दाखल केला. परंतु १९६८ मध्ये स्वतः संस्थेनेच मुस्लिम पक्षकारांशी सामंजस्य करार केला. या अंतर्गत, मुस्लिम पक्षकारांनी मंदिरासाठी आपला काही हिस्सा सोडला आणि त्याऐवजी त्यांना संस्थेने आपल्या जवळील जागा दिली.

तथापि, याचिका दाखल करण्यात आली असली तरी याप्रकरणात Place of worship Act 1991 च्या कायद्यानुसार अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. या कायद्यानुसार १ ऑगस्ट १९४७ रोजी अस्तित्वात असलेले धार्मिक स्थळ हे त्या समुदायाच्या मालकीचेच राहील. या कायद्यातून केवळ रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादाला सूट देण्यात आली होती.

Team Lokshahi News