Categories: कृषी

रेशीम कोश काढणीला आलेत, पण कोरोनामुळे विक्री शक्य नाही? अशावेळी करा ‘हे’ काम..!

कोल्हापूर। सध्या कोरोनाने थैमान घातले असून सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. रेशीम उत्पादक शेतकरीही यामुळे मोठ्या संकटात सापडले असून तयार झालेले कोश विक्री करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर उभं ठाकलय. याविषयी शिवाजी विद्यापिठातील रेशीम शेती विषयक मार्गदर्शन केंद्राचे डॉ. अधिकराव जाधव यांनी सल्ला दिला आहे. 

  • शेतकरी बंधूनो आपल्याकडे आता कोश तयार झाले असतील. परंतु सध्या कोशांची विक्री आणि वहातूक करणे शक्य नाही. त्यामुळे सद्य परिस्थीत कोश वाळवून त्याची साठवणूक करणे गरजेचे आहे. त्यानंतर सर्वकाही सुरळीत झाल्यानंतर या कोशांची विक्री करता येईल. सध्या कोश खरेदीसाठी नंदिनी सिल्क वाठार आणि इतर काही संस्था शेतकऱ्यांना मदत करत आहेत. पण सर्वांनाच हे शक्य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी घरच्या घरी कोश सुकवून त्याची काळजी घेण गरजेचे आहे. यासाठी कोश उन्हात किमान ३ दिवस ठेवा. कोश उघड्यावर राहणार नाहीत याची काळजी घ्या. त्यावर काळा प्लास्टिकचा कागद किंवा कापड अगदी साडी पसरलीत तरी चालेल. कोश उघडे सुकवाल तर धागा तुटुन नुकसान होण्याची शक्यता आहे. ऊनातील अतिनील किरणांमुळे त्यातील प्रथिने कमकुवत होतात. असे कोश धागा केंद्राना नुकसान देतात. त्यामुळं कोश सुकवताना काळीपूर्वक काम करा. सुकवलेले कोश त्यानंतर संगोपन घरातील रॅक वर एक थरात पसरून ठेवा. उंदीर, घुशी, घारुटी आणि इतर कीटक, लाल मुंगी हे कोशांचे नुकसान करू शकतात. त्यामुळे त्यांच्या बंदोबस्ताचे उपाय करा. रॅक वर मुंग्या जाऊ नयेत म्हणून रॅकच्या खालच्या बाजूस ग्रिस लावा.
Team Lokshahi News