Categories: कृषी

कोल्हापूर जिल्ह्यात ‘महा-रेशीम अभियान २०२०’ ला प्रारंभ

रेशीम शेती शेतकऱ्यांच्या फायद्याची – जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे प्रतिपादन

कोल्हापूर। रेशीम शेतीतून मिळणारे आर्थिक उत्पन्न चांगले असल्याने अधिकाधिक शेतकऱ्यांना रेशीम शेतीकडे प्रोत्साहित करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात महा-रेशीम अभियान २०२० राबवण्यात येत आहे. याअंतर्गत जिल्ह्यास यंदा २०० एकर तुती लागवडीचे उद्दिष्ट असून हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महा-रेशीम रथाचा उपक्रम सहाय्यभूत ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी व्यक्त केला. महा-रेशीम अभियानांतर्गत महा-रेशीम रथाचा  शुभारंभ जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी हिरवा झेंडा दाखवून केला, यावेळी ते बोलत होते. 

जिल्हा रेशीम विकास कार्यालयाच्यावतीने आजपासून संपूर्ण जिल्ह्यात हा रथ फिरणार असून, यावेळी रेशीम सल्लागार समिती सदस्य डॉ. ए.डी. जाधव, रेशीम विकास अधिकारी एस.एस. शिंदे, मनरेगा प्रकल्प अधिकारी श्री. पवार, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक बी.एम. खंडागळे व क्षेत्र सहाय्यक जे.आर.मोरे, वाय.ए. पाटील, सुनिल पाटील आदी उपस्थित होते. 

महा-रेशीम अभियानांतर्गत ८ जानेवारी ते २१ जानेवारीअखेर अभियान रथ जिल्ह्यात ठिकठिकाणी फिरणार आहे. गडहिंग्लज समूहांतर्गत शेंद्री, इंचनाळ, कडगांव, कुमरी, हल्लारवाडी,  करवीर समुहांतर्गत म्हाळूंगे, कोतोली, आरळे, बेले, भूये व हातकणंगले समुहांतर्गत नरंदे, मिणचे, कुंभोज, वाठार (बुवाचे), खोची, दूर्गेवाडी या गावात फिरवण्यात येणार आहे. या रथामार्फत या कालावधीमध्ये ऑनलाईन नोंदणी होणार असल्याने लाभार्थींनी परिपूर्ण कागदपत्रासह नोंदणी करणे गरजेचे आहे. अभियान कालावधीत जे लाभार्थी नोंदणी करतील अशा लाभार्थी सन २०२०-२१ सालाकरीता मनरेगा योजनेंतर्गत शासनाच्या निकषानुसार पात्र राहतील. सदरच्या नोंदणीच्या कार्यक्रमासाठी समूहनिहाय/ ग्रामपंचायतनिहाय कृती आराखडा तयार केला असून त्या ग्रामपंचायत अंतर्गत  ग्रामसेवक, कृषी सहाय्यक व तलाठी यांच्या समन्वयातून ग्रामस्तरापर्यंत योजनेची जनजागृती  करण्यात येत आहे. 

अधिक माहितीसाठी रेशीम विकास अधिकारी श्रेणी-२, जिल्हा रेशीम कार्यालय, ५६४ ई-वॉर्ड, व्यापारी पेठ, शाहुपूरी, कोल्हापूर येथे दूरध्वनी क्र. 0231-2654403 व reshimkolhapur@gmail.com या ई-मेल वर संपर्क करावा, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी एस.एस. शिंदे यांनी केले आहे.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: bank insurance bank loan crop insurance farmer insurance farmer producer company ICICI insurance Kotakinsurance loan for farmer Reshim Sheti sbi bank loan sericulture farmer sericulture farming