Categories: Featured आरोग्य

सोलापूरात पोलिस उपनिरिक्षकाचा कोरोनाने मृत्यु, ‘या’ठिकाणी होते कार्यरत!

सोलापूर। सोलापूर जिल्ह्यात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत असताना लोकांच्या संरक्षणासाठी कार्यरत असणाऱ्या पोलिसांनाच कोरोनाची बाधा होत आहे. त्यामुळे राज्यात पोलिसांचे कोरोनाने मृत्यु होऊ लागलेत. सोलापूरात देखील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सोलापुरात पोलिसांचा पहिला कोरोना बळी आहे. सोलापुरातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा १० वर पोहोचला आहे. तर आत्तापर्यंत राज्यात पाच पोलिसांचा कोरानोने बळी घेतलाय. 

कोरोनाच्या महारोगराईला हद्दपार करण्यासाठी राज्यभर पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यात येणारे २१० पैकी तब्बल १८० मार्ग बंद करून त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावला आहे. दरम्यान, ग्रामीण भागात बंदोबस्त देणाऱ्या व शहरातील पोलीस मुख्यालयात राहणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. राज्यात कोरोनाबळींचा आकडा वाढत चालला आहे. त्यात आता कोरोनाने पोलिसांनाही आपल्या विळख्यात घेतलं आहे. 

सोलापूर येथील एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाविरोधात लढताना त्यांची प्राणज्योत मालवली. पोलीस महासंचालक आणि महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या कुटुंबियांप्रती सहानुभूती व्यक्त करत आहेत, अशी माहिती महाराष्ट्र पोलिसांच्या ट्वीटर हॅण्डलवर देण्यात आली आहे.

राज्यात आज दिवसभरात तब्बल ३८ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे राज्यभरातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या तब्बल ४९५ वर पोहोचली आहे. यामध्ये ५० अधिकारी आणि ४४५ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दक्षिण मुंबईतील एक आयपीएस अधिकारीही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं काल समोर आलं होतं.

कोरोनाच्या संकटात वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह पोलिसही अहोरात्र मेहनत घेत आहेत. मात्र हेच पोलिस कोरोनाच्या कचाट्यात येत आहेत. अनेक पोलिसांना कोरोनाची लक्षणे दिसत आहेत. ४२ अधिकारी आणि ४१४ कर्मचारी अशा एकूण ४५६ पोलिसांना कोरोनाची लक्षणे दिसून आली आहेत. दुसरीकडे आठ अधिकारी आणि २७ पोलीस कर्मचारी असे एकूण ३५ जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर दुर्दैवाने पाच पोलिसांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: solapur news सोलापूर जिल्हा घडामोडी