Categories: Featured आरोग्य

कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागप्रमुखांना दिल्या ‘या’ विशेष सूचना

कोल्हापूर। कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी नेमून दिलेली जबाबदारी सर्व विभाग प्रमुखांनी सक्षमपणे पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज सभागृहात विविध विभाग प्रमुखांची जिल्हाधिकारी देसाई यांनी बैठक घेवून नेमून दिलेल्या जबाबदारीच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. (kolhapur corona update)

याबैठकीला महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी.केम्पीपाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीवन अल्वारिस, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी देसाई यावेळी म्हणाले, युएस, दुबई, सौदी अरेबीया, चीन, इटली, फ्रान्स, जर्मनीया देशातून येणाऱ्या प्रवाशांना संस्थात्मक ठिकाणी अलगीकरण करावे. त्यासाठी सीपीआरने पथक ठेवावे. आशा, अंगणवाडी सेविका यांना सर्वेक्षणाचे काम द्यावे. त्याचबरोबर त्यांना मास्क पुरविण्यात यावा. बसेस, बसस्थानक, सार्वजनिक ठिकाणी जनजागृती करणारे फलक लावावेत. त्याचबरोबर घंटागाडीच्या माध्यमातून जनजागृती करणारी जाहिरात करावी. जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा असल्याबाबाबतही घंटा गाडीच्या माध्यमातून प्रसार करावा.

सोडियम हायपो क्लोराईडच्या सहायाने सार्वजनिक ठिकाणी बसेस, बसस्थानक यांची सफाई करावी, असे सांगून जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, त्यासाठी जिल्हा परिषदेने पुरवठा करावा. सर्व आरोग्य अधिकारी यांनी त्यांच्या विभागाचे आदेश तसेच सूचना यांची अंमलबजावणी करावी. सर्व व्यायाम शाळा, तालिम, वॉटर पार्क, संग्रहालये, उद्याने, चित्रपटगृह, जलतरण तलाव, नाट्यगृहे, मंदिरे, प्रार्थना स्थळे बंद झाल्याची खात्री प्रभाग अधिकाऱ्यांच्या माध्यमातून महापालिकेने करावी. अंमलबजावणी होत नसल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे. 

परदेशी सहलींचे आयोजन करणाऱ्या संस्थांकडून परदेशी गेलेल्या पर्यटकांची यादी मिळवून महापालिकेने त्याबाबत संनियंत्रण करावे. बाहेरुन येणाऱ्या वाहनांसाठी ड्रॉपिंग पॉईंट तयार करावा आणि त्या ठिकाणी तपासणी करावी. समाज माध्यमांतून अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करावी. दिलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी, असेही ते म्हणाले.

Team Lokshahi News