Categories: सामाजिक

शिक्षक सुधीर बंडगर यांना राज्यस्तरीय ‘विद्यार्थीमित्र पुरस्कार’ जाहीर

इस्लामपूर। येथील समाजशिल शिक्षक सुधीर रामचंद्र बंडगर यांना संवेदना फाउंडेशन व माइंडफुलनेस एज्यूकेशन संस्था मुंबई (ठाणे) यांच्यावतीने देण्यात येणारा यावर्षीचा मानाचा राज्यस्तरीय “विद्यार्थीमित्र पुरस्कार” नुकताच जाहीर झाला आहे. २८ फेब्रुवारी २०२० रोजी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सन्मान सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

शिराळा येथील हाय्यर एज्यूकेशन सोसायटी, शिराळा संचलित गांधी सेवाधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, आरळा येथे सुधीर बंडगर सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. डोंगरी, दुर्गम, चांदोली जंगलातील वाडया-वस्त्यावर पोहचुन त्यांनी शिक्षणप्रसार, क्रीडाप्रसार व प्रबोधनात्मक उपक्रम राबविले आहेत. त्यांनी स्वखर्चाने, विना-मानधन जंगलातील वाडी – वस्तीवर पोहचून वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणापर्यंत व उच्च शिक्षणापर्यत पोहचविण्याचे कार्य केले आहे. खेळाचे महत्व पटवुन देऊन क्रीडा प्रशिक्षण देऊन तेथील विद्यार्थ्यांना राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न केले आहे. 

पुणे येथे झालेल्या आतंरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्ध्यमध्ये त्यांनी दोन वेळा सहाय्यक पंच म्हणुन काम पाहिले आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ ,पुणे अॅथलेटिक्स संघाचे प्रशिक्षक म्हणुन काम केले आहे. जंगलातील, दुर्गम, डोंगरी  भागातील विद्यार्थ्यांपर्यंत वाचन चळवळ पोहचावी. आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना करिअर विषयक पुस्तके मिळावित. यासाठी डोंगरी ग्रंथालयाची स्थापना केली आहे. याव्दारे विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके उपल्ध करून दिली आहेत. डोंगरी भागात शालेय वस्तूचे वाटप, संसार उपयोगी वस्तू, कपडे, पुस्तके, सायकल वाटप केले आहे. 

त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत यंदा “विद्यार्थीमित्र पुरस्कार” पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यापुर्वी त्यांना राज्यस्तरीय समाजमित्र, कविरत्न, लोकराज्य आदर्श शिक्षक, आदर्श क्रीडा प्रशिक्षक, मैत्र जिवा चारा अभियान, शिवरत्न आदर्श शिक्षक, इत्यादी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: sudhir bandgar विद्यार्थीमित्र पुरस्कार सुधीर बंडगर