Categories: गुन्हे सामाजिक

‘या’ खास कामांसाठी कबनूर ग्रामपंचायतीची यंत्रणा गतीमान!

इचलकरंजी | प्रवीण पवार | कबनूर येथे ग्रामपंचायत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी संगनमताने अनेक भ्रष्टाचाराची कामे केली आहेत. याबाबतची चौकशी करून संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी कबनूर शिवसेना प्रमुख प्रशांत जगताप यांनी केली आहे. तसे निवेदन जिल्हाधिकारी व गटविकास अधिकारी हातकणंगले यांच्याकडे दिले आहे.

कबनूर ग्रामपंचायत सदस्यांची मुदत आठ ऑगस्ट रोजी संपत आहे. यामुळे जाता जाता ढपला पाडण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायतीतील प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून विद्यमान लोकप्रतिनिधींनी अनेक बेकायदेशीर कामे मंजूर केली आहेत. ही मंजूर कामे पूर्ण करण्याचा सपाटा ग्रामपंचायतीने लावला असून यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप शहर प्रमुख प्रशांत जगताप निवेदनामध्ये केला आहे.

ग्रामपंचायतीने अनेक कामांमध्ये टेंडर मधील तरतुदींपेक्षा वाढीव बिले दिल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे काही बिले तर काम न करताच अदा केल्याचे दिसत आहे. एका माजी सरपंचाने याबाबत कहरच केला असून कामाचे बिल अदा न केल्यामुळे प्रोसिडिंग बुकच घरी पळवून नेण्याचा प्रताप केला आहे. याबाबतही प्रशासनाने कोणतीही कारवाई केल्याचे दिसून येत नाही. घरफाळा रक्कमेबाबतही मोठा घोळ असून वसुली केल्यानंतर त्याची रक्कम बँक खात्यावर जमा न करता परस्पर खर्च दाखवून उचलली आहे. जलस्वराज्य प्रकल्पात सुध्दा मोठा घोटाळा झाला असून बोगस गळती, पाईपलाईन बदलणे, मोटार दुरुस्ती, पॅनल बदलणे अशी विविध कामे दाखवून रक्कम उचलण्यात आली आहे. याबरोबरच ग्रामपंचायत इमारत नूतनीकरणाच्या नावाखाली प्रचंड निधी खर्च केला आहे. कचरा डेपोची जागा अद्याप निश्चित नाही तरीही कचरा डेपोवर नवीन कोटीची मशिनरी खरेदी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

एकूणच ग्रामपंचायत सदस्यांची मुदत संपत असताना जाता जाता कोट्यवधी रुपयांचा डल्ला मारण्याचा कुटिल डाव ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आखला असून याबाबत संपूर्ण चौकशी करावी व संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. प्रशासनाने याची त्वरित दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अन्यथा शिवसेना स्टाईलने तालुकाप्रमुख आनंदा शेट्टी यांचे नेतृत्वाखाली उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

निवेदनावर भारत पवार, दिग्विजय इंगवले, रवी धनगर, सुनील नरंदेकर, यशवंत चव्हाण, मधुमती खराडे, संगीता यादव, श्याम हावळकर, सचिन गोंडबाळ, सागर कोले, आकाश चौगुले, ऋषिकेश चव्हाण, जितेंद्र यादव, दीपक ईजरे, विजय हजारे, विनायक पवार यांच्या सह्या आहेत.

Team Lokshahi News